कोल्हापूर : विधान परिषदेसाठी दुरंगी की तिरंगी लढत होणार याचा फैसला आज, शनिवारी होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांशी बोलून आपली भूमिका जाहीर करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, व अपक्ष स्वरूप महाडिक हे माघार घेणार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्यातच सरळ सामना होणार हे निश्चित आहे. विधान परिषदेसाठी सतेज पाटील, आमदार महाडिक, स्वरूप महाडिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेखान जमादार, अशोक जांभळे, विजय सूर्यवंशी, ध्रुवती सदानंद दळवाई, चंद्रकांत खामकर, आदींचे अर्ज आहेत. शनिवार माघारीचा शेवटचा दिवस असून माघारीसाठी सतेज पाटील व आमदार महाडिक यांनी दिवसभर मनधरणी सुरू केली. राष्ट्रवादीने सतेज पाटील यांना पाठिंबा दिल्याने राजेंद्र पाटील हे शनिवारी माघार घेणार आहेत. आमदार सुरेश हाळवणकर हे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यानंतरच विजय सूर्यवंशी यांच्या माघारीबाबत निर्णय होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. राजेखान जमादार हे संजय मंडलिक यांचे समर्थक आहेत. त्यामुळे जमादारही यावेळी माघार घेतील, अशी स्थिती आहे. यड्रावकर यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. आवाडेंची माघार कोणासाठी ?उमेदवारीसाठी आवाडे यांनी निकराचे प्रयत्न केले. सतेज पाटील यांच्या विरोधात महाडिक, पी. एन. पाटील यांना एकत्रित करून पक्षश्रेष्ठींवर दबावाचा प्रयत्न केला तरीही उमेदवारी न मिळाल्याने आवाडे नाराज आहेत. त्यांनी माघार घेतली असली तरी त्यांची माघार कोणाच्या पथ्यावर पडणार, याविषयी आज, दिवसभर उलट-सुलट चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यड्रावकर हे शनिवारी माघार घेतील. - हसन मुश्रीफसुरेश हाळवणकर हे प्रदेशाध्यक्षांशी बोलून विजय सूर्यवंशी यांच्या उमेदवारीचा निर्णय घेणार आहेत. - चंद्रकांतदादा पाटीलस्वरूप महाडिक शनिवारी आपली उमेदवारी माघार घेतील. उर्वरित इच्छुकांशी आम्ही संपर्कात आहे. -महादेवराव महाडिक
यड्रावकर, स्वरूप महाडिक माघार घेणार
By admin | Published: December 12, 2015 12:57 AM