घनश्याम कुंभार- यड्राव-‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हे संतवचन प्रत्यक्ष कृतीत उतरविल्याने ध्येय गाठण्यासाठी बाळगलेल्या जिद्दीस कसे घवघवीत यश मिळते, हे येथील चार युवकांनी पोलीसपदी व एका युवकाची पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंतापदी निवड झाल्याने सिद्ध करून दाखविले आहे. परिसरातील प्रयत्नवादी युवकांना मार्गदर्शनाचे पाठबळ मिळाल्यास त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी प्राप्त होतील.आर्थिक परिस्थिती बेताची, शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले घर, सराव व अभ्यासासाठी आवश्यक साधनांची कमतरता, मार्गदर्शनाचा अभाव, समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन यांसारख्या अनेक प्रश्नांचा बाऊ न करता प्रयत्न केले, तर निश्चित यश मिळेल, ही सद्भावना व मिळेल त्या साधनसामग्रीच्या वापराने घेतलेल्या परिश्रमाचे यशात रूपांतर झाले.तेजस्विनी दादासो आदमाने हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शक्य होईल तिथे धावण्याचा सराव. मिळेल त्या पुस्तकातून अभ्यास करीत घरच्यांच्या आधारावर यड्रावमधील पहिली महिला पोलीस होण्याचा मान मिळविला आहे.सागर श्रीकांत चावरे याची मुंबई शहरामध्ये मुंबई पोलीस म्हणून निवड झाली आहे. तरीही दहशतवाद विरोधी कारवाई करण्यासाठी निर्माण झालेल्या ‘क्वीक रिस्पॉन्स टीम’मध्ये खात्यांतर्गत विभागात निवड होऊन त्यातून देशसेवा करण्याची त्याची इच्छा आहे. चंद्रकांत अनिल कोळी या धावपटू युवकाने सुमारे ७०हून अधिक राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक दहा ठिकाणी, द्वितीय क्रमांक १२ ठिकाणी, तृतीय क्रमांक सात ठिकाणी येऊन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याची मुंबई येथे महाराष्ट्र रेल्वे पोलीस म्हणून निवड झाली आहे.अविनाश सुऱ्याप्पा माने या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मुंबई येथे पोलीसपदी निवड झाली आहे. मेहबूब बाळासो गोलंदाज या युवकाने घरची गरीब परिस्थिती असूनही डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. त्याची नुकतीच कोल्हापूर येथे पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता वर्ग - २ पदी निवड झाली आहे. युवकांनी स्वकर्तृत्वावर मिळविलेले यश गौरवास्पद प्रेरणादायी आहे
यड्रावमधील युवकांची जिद्द प्रेरणादायी!
By admin | Published: October 02, 2014 10:55 PM