यड्राव : येथील ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र नळपाणी पुरवठ्याचे काम विस्तारित भागात करण्यास ठेकेदार दिरंगाई करीत आहेत. याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये योजनेचे पाणी सुरू होऊनसुद्धा अद्याप पोट पाईपलाईन बऱ्याच भागात टाकली नसल्याने यड्रावची नळपाणी पुरवठा योजना वादग्रस्त बनत आहे. आठ दिवसांत पाईपलाईनचे काम न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे. एक वर्षापूर्वी आर. के. नगर भागात पोट पाईपलाईन टाकण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये योजनेचे पाणी सुरू झाले; परंतु या भागात अद्यापही मुख्य जलवाहिनीला पोट पाईपलाईन जोडल्या नाहीत. काही भागात जुन्या सदोष जलवाहिनीमधून पाणीपुरवठा सुरू आहे.आर. के. नगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून जलवाहिनी टाकण्यासाठी जेसीबी मशीनद्वारे ठेकेदाराकडून खुदाई केली आहे; परंतु अद्याप यामध्ये जलवाहिनी टाकण्यास तत्परता दाखविली जात नाही. याकडे ग्रामपंचायत गांभीर्याने पाहत नसल्याने पाण्याची केव्हापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल? असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनमधून या स्वतंत्र योजनेची पाईपलाईन जोडून ग्रामपंचायतीने बचतीचा मार्ग स्वीकारला आहे. एक वर्षापूर्वी सांगली नाक्याकडून स्टेट बॅँकेसमोरून स्वामी कारखान्याकडे जाणारी जलवाहिनी टाकली आहे; परंतु ती अद्याप जोडली नाही. या जलवाहिनीच्या पूर्वेकडे शरद आयटीआयच्या बाजूस त्याच वेळेस टाकलेल्या जलवाहिनीतून कायम पाणी वाहत आहे. ग्रामपंचायतच प्रभागांतर्गत पाणी योजना वादग्रस्त बनविण्यास कारणीभूत ठरत आहे. याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)
यड्रावची पाणीपुरवठा योजना वादात
By admin | Published: April 17, 2015 9:39 PM