कोल्हापूर : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त शनिवार पेठेतील खोल खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा रविवारी रात्री उत्साहात झाला. यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करीत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष केला. दिवसभर विविध धर्मिक कार्यक्रम झाले.खोल खंडोबा देवस्थान ट्रस्टतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी उत्सवानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. उत्सवाची सांगता रविवारी रात्री पालखी सोहळ्याने झाली. रात्री आठच्या सुमारास ट्रस्टचे खंडेराव जगताप यांच्या हस्ते आरती व पालखीला सुरुवात झाली. मंदिराभोवती पाच फेऱ्या काढण्यात आल्या.
यानंतर ट्रॅक्टरमधून पालखी बुरुड गल्ली, विठ्ठल मंदिर मार्गे पुन्हा मंदिरात आली. यावेळी पारंपरिक वाद्ये, मानाचा घोडा पालखीचे आकर्षण ठरले. मंदिराच्या चौकात नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. पालखीच्या मार्गावर फुलांची सजावट आणि आकर्षक रांगोळी काढली होती. ट्रस्टतर्फे प्रसादाचे वाटप झाले. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, विजय सूर्यवंशी, लता कदम, घनश्याम जगताप, रघुवीर देसाई, आदी उपस्थित होते.