मुरगूड : यमगे (ता. कागल) गावालगत असणारा ६० एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत भस्मसात झाला. ४० शेतकऱ्यांचे प्राथमिक अंदाजानुसार ७० लाखांचे नुकसान झाले असून, शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनाम्याला सुरुवात केली आहे. अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करूनही भरदुपारीच आगीने रौद्र रूप धारण केल्याने ऊसपीक वाचविता आले नाही. यमगेच्या मुख्य रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या ऊस शेतामधून भडगाव १० फिडरवरून मोटारपंपांसाठी गेलेल्या विद्युतवाहिनीच्या खांबावर शॉर्टसर्किट झाले. भारत मांडवे यांच्या घराच्या मागील बाजूस असणाऱ्या या खांबावर आवाज होऊन ठिणग्या पडल्या. त्याचवेळी विद्युतवाहिनी तुटून खाली पडली. पाला वाळलेला असल्याने ठिणग्या पडल्यापडल्या आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या धुराने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतामध्ये रस्त्यालगतच वस्ती आहे. आग या घरांपर्यंत पोहोचू नये, यासाठी तत्काळ मुरगूड नगरपरिषद, हमीदवाडा कारखाना, बिद्री कारखाना यांच्या अग्निशामक बंबांनी घरासभोवताली पाण्याचा मारा केला. त्यामुळे घरांना झळ पोहोचली नाही. सुमारे ६० एकरांचा सलग ऊसपट्टा असल्याने आग आटोक्यात आणण्यास अडचणी येत होत्या. दुपारी बाराला लागलेली आग सायंकाळी पाचपर्यंत होती. यात आबासो खराडे, भारत मांडवे, बाजीराव मांडवे, मारुती मांडवे, के. डी. चौगले (भडगाव), शिवाजीराव पाटील, शंकरराव किल्लेदार, गणपतराव किल्लेदार, बाजीराव पाटील, अमोल पाटील, अभिजित पाटील (निढोरी), मोहन ढेरे, शिवाजी ढेरे, गणपतराव दाखाडकर, अनिल अर्जुन पाटील, पंडित अर्जुन पाटील, विक्रांत भोपाळे, संजय पाटील, आदी शेतकऱ्यांचा व सर पिराजीराव ट्रस्टचा १५ एकर ऊस जळाला. (प्रतिनिधी)
यमगेत ६0 एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाला
By admin | Published: November 07, 2015 12:33 AM