नवीन चेहऱ्यांना संधी
इच्छुकांची संख्या मोठी
अनिल पाटील
मुरगूड : कागल तालुक्यातील संवेदनशील म्हणून अगदी वरच्या क्रमांकावर असलेल्या यमगे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत होणार, हे निश्चित आहे. मुश्रीफ व संजय घाटगे यांच्याविरोधात मंडलिक राजे व रणजित पाटील गट यांनी एकत्रित लढण्याची जोरदार तयारी केली आहे. पण काही जाणकार तरुण निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. युवा वर्गाबरोबर जुन्या-जाणत्या उमेदवारांचीही मांदियाळी झाली आहे. पण दोन्ही आघाडीतून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावात राजकीय धुळवडीला जोर चढला आहे. कागल तालुक्यातील पंचायत समितीचा मतदारसंघ म्हणून यमगे गावाची निवड केली आहे. परिसरातील सर्वात मोठे गाव म्हणून यमगेचा उल्लेख केला जातो. ११ सदस्य असणाऱ्या या पंचायतीमध्ये मागील निवडणुकीत मुश्रीफ मंडलिक राजे व पाटील गटाने एकत्रित येत तब्बल १० जागा जिंकत एकहाती सत्ता हस्तगत केली होती, तर विरोधात एकाकी झुंज देणाऱ्या संजय घाटगे गटाच्या बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना असूनसुद्धा एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते.
सध्या सुरुवातीपासूनच मागील पंचवार्षिक निवडणुकीतील महाआघाडीतील मंडलिक व राजे गटाने एकत्र येत युती केली असून, त्या दृष्टीने व्यूहरचना सुरू आहे; तर मागील निवडणुकांत विरोधात असणाऱ्या मुश्रीफ आणि संजय घाटगे गटाने एकत्र येत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. सरपंच पदाचे आरक्षण माहीत नसल्याने मात्र दोन्ही आघाड्यांत कमालीची गोंधळाची स्थिती आहे. मागील निवडणुकीच्या आधारावर नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा अनुसूचित जमाती यामधील सरपंच आरक्षण पडण्याची शक्यता गृहीत धरून या प्रवर्गातील चांगले उमेदवार निवडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. चार प्रभागांमध्ये ३१३१ मतदार असून, एक, दोन आणि चारमध्ये तीन सदस्य, तर प्रभाग तीनमध्ये दोन सदस्य निवडले जाणार आहेत. अद्याप अर्ज दाखल केले नसले, तरी ऑनलाईन अर्ज भरण्याची धांदल मात्र दिसत आहे. गेली पाच वर्षे गावात सर्वच गटांमध्ये सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे निवडणुकीने पुन्हा वातावरण बिघडू नये, यासाठी निवडणुकीला फाटा देऊन ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी, यासाठी काही तरुण धडपडत आहेत. अर्थात सर्वांनी बिनविरोधसाठी सकारात्मकता दाखवली असली, तरी अर्ज माघारीच्या शेवटच्यादिवशी यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.