कोल्हापूर : शिक्षक, प्रशासक, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता याबरोबरच कुटुंबवत्सल उत्तम माणूस म्हणून प्राचार्य य. ना. कदम यांचे कार्य उत्तुंग होते. त्यांच्या जीवनावरील ‘यनायण’ हा स्मृतिग्रंथ, तर सामाजिक इतिहासाचा संदर्भ ग्रंथ म्हणून पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केला.
दिवंगत प्राचार्य डॉ. य. ना. कदम यांच्यावर लिहिलेल्या यनायण या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन रविवारी शाहू स्मारक मिनी सभागृहात झाले. ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्याध्यक्ष अरुण रोडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. पवार यांनी चित्रफितीद्वारे मनोगत व्यक्त करताना, बहुजन समाजातील य. ना. कदम यांचे योगदान, त्यांचा आवाका खूपच वाखाणण्याजोगा आणि अनुकरण करण्यासारखा होता, असे सांगून, या स्मृती ग्रंथाच्यानिमित्ताने त्यांच्या आयुष्याच्या अनेक पैलूंवर उत्तम प्रकाश टाकण्यात आल्याने हा ग्रंथ अभ्यासपूर्ण झाल्याचे सांगितले. य. ना यांच्या मुलांनी वडिलांच्या आठवणी जपून ठेवत पुस्तकाच्या माध्यमातून ते कर्तृत्व नव्या पिढीसमोर आणले, याचे अनुकरण नव्या पिढीने करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी अरुण रोडे यांनी य. ना यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू सांगितले. यावेळी प्राचार्य य. ना. कदम सेवा ट्रस्टच्या अध्यक्ष सरोज कदम, डॉ. महेश कदम, डॉ. बी. एम.हिर्डेकर, शिरीष देशपांडे, बाबा सावंत, डॉ. अरुण भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट ०१
ज्येष्ठ नागरिक संघ (फेस्कॉम)चा समग्र इतिहास व स्वत:चे आत्मचरित्र लिहिण्याचे काम य. ना यांनी हाती घेतले होते, पण तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याने हे काम अर्धवट राहिले होते. काम ‘यनायण’ पुस्तकाच्या माध्यमातून पूर्ण झाले असून, आता फेस्कॉमचेही काम पूर्ण झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळींनी हे काम पूर्ण केले.
फोटो: १४०३२०२१-कोल-कदम पुस्तक
फोटो ओळ : प्राचार्य य. ना. कदम यांच्यावरील ‘यनायण’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी शाहू स्मारकमधील मिनी सभागृहात झाले. यावेळी डावीकडून अरुण भोसले, बाबा सावंत, अरुण रोडे, बी. एम. हिर्डेकर, सरोज कदम, महेश कदम उपस्थित हाेते.