लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : बांधकाम कामगारांच्या धर्तीवर राज्यातील यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, महिन्याभरात त्याला मूर्तस्वरूप आणू, असे आश्वासन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
येथील रोटरी सेंट्रल सभागृहात सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांना मध्यान भोजन प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, यंत्रमाग कामगारांच्या मंडळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परंतु, सध्या मंत्रालयात बैठका होत नाहीत. तरीही व्हिसीद्वारे राज्य पातळीवर व्यापक बैठक घेऊन महिन्याभरात मंडळ स्थापन करू. बांधकाम कामगारांसाठी केंद्र सरकारने सन १९९६ साली इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा केला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी राज्यात झाली नव्हती.
मी पहिल्यांदा जेव्हा कामगार मंत्री झालो, तेव्हा त्याची अंमलबजावणी केली. या योजनेमध्ये आणखीन विविध २१ प्रकारच्या कामगारांचा समावेश करण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत लागू केली आहे.
भरमा कांबळे यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे मुश्रीफ यांचे लक्ष वेधले. अप्पर कामगार आयुक्त पुणे शैलेंद्र पोळ यांनी प्रास्ताविक करून कामगारांच्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक मदन कारंडे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, नितीन धूत, मयूर शहा, अमित गाताडे, आदींसह विविध बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
चौकट
अण्णा खूश झाले असते या कार्यक्रमास आमदार प्रकाश आवाडे असते, तर बरे झाले असते. सुरू झालेल्या या योजना पाहून आता अण्णांना राग आला नसता, ते खूश झाले असते, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
फोटो ओळी
०९०७२०२१-आयसीएच-०७
इचलकरंजीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेच्या प्रारंभप्रसंगी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ए. वाय. पाटील, राजीव आवळे, मदन कारंडे, डॉ. विकास खरात, नितीन धूत, आदी उपस्थित होते.
छाया - उत्तम पाटील