इचलकरंजी : सहकार क्षेत्रातील सूतगिरण्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मंत्रिमंडळाने प्रतिचाते तीन हजार रुपयांप्रमाणे बॅँकांकडून घेतलेल्या अर्थसहायावर शासनाकडून हमी व व्याज देण्यात येईल, अशा आशयाचा निर्णय घेतल्यामुळे याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील २८ सूतगिरण्यांना मिळणार आहे. कापूस व वीज दरवाढ आणि सुताच्या दरात झालेली घट यामुळे नुकसानीत गेलेल्या गिरण्यांना आता ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे.गेली दोन वर्षे विजेचे वाढलेले दर आणि कापसाचे चढे भाव, तर सूतगिरण्यांकडील सुताला उत्पादित खर्चाच्या प्रमाणात नसलेली मागणी, अशा व्यस्त प्रमाणामुळे सहकारी सूतगिरण्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत होता. पश्चिम महाराष्ट्रातील काही गिरण्या वगळता अन्य गिरण्यांना होणाऱ्या नुकसानीमुळे त्या अडचणीत आल्या. त्यामुळे गिरण्यांना ऊर्जितावस्था मिळण्यासाठी शासनाकडे मागणी होत होती. दरम्यान, वस्त्रोद्योगासाठी नेमलेल्या आमदार हाळवणकर समितीने शासनाने सूतगिरण्यांना प्रतियुनिट तीन रुपये सवलतीने वीज अनुदान व प्रतिचाते (स्पिंडल) तीन हजार रुपये अर्थसहाय करावे; अन्यथा गिरण्यांनी घेतलेल्या कर्जावर हमी व व्याज अनुदान द्यावे, अशी शिफारस होती. सूतगिरण्यांनी कोणत्याही बॅँकेकडून प्रतिचाते तीन हजार रुपयांप्रमाणे कर्ज घ्यावे. या कर्जासाठी शासन हमी देईल. तसेच सलग पाच वर्षे किंवा बॅँका कर्जासाठी देतील त्या मुदतीपर्यंत व्याज अनुदान शासन देईल. दरम्यान, कर्जाची गिरण्यांनी परतफेड करावी, असा निर्णय सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. तसेच सूतगिरण्यांना प्रतियुनिट तीन रुपयांप्रमाणे सवलतीसाठी निर्णय घेण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समिती नेमली, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी बोलताना दिली. वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी आपण केलेल्या अन्य शिफारशींना- सुद्धा शासनाची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. शासनाचा निर्णय स्वागतार्हसूतगिरण्यांना असलेल्या अडचणीच्या वेळी कर्जावरील व्याज दराचे अनुदान आणि हमी देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. अशाच प्रकारे यंत्रमाग उद्योगालाही ऊर्जितावस्था मिळण्यासाठी शासनाने लवकरच पॅकेज जाहीर करावे, अशी प्रतिक्रिया माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी शासनाच्या या निर्णयावर बोलताना दिली.
सूतगिरण्यांना मिळेल ऊर्जितावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2017 12:30 AM