कोल्हापूर : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची येत्या शुक्रवारी (दि.१२) होत असलेली जयंती कोल्हापुरात यशवंत उत्सव म्हणून साजरी होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुढाकाराने यशवंतरावांच्या जीवनावर आधारीत वकृत्व स्पर्धा, बीज भाषण, बक्षीस वितरण आणि कोल्हापुरातील पहिल्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी असे भरगच्च उपक्रम ठरवण्यात आले आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील यांनी दिली आहे.महाराष्ट्राची जडणघडणीतील प्रेरणादायी कार्य, देशाचे अर्थ, परराष्ट्र, संरक्षण, गृह अशी मंत्रिपदे सांभाळून उपपंतप्रधान म्हणून उतुंग कार्य करणाऱ्या यशवंतरावांची ओळख नव्या पिढीला व्हावी म्हणून प्रतिष्ठानने यावर्षीपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत गुरुवारी (दि.११) तीन गटांत वकृत्व स्पर्धा होणार आहेत.
कोल्हापूर शहरातील प्राथमिक शाळेतील १२, ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेतील १२ आणि कराडमधील १६ अशा ३८ विद्यार्थ्यांची स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शाहू स्मारक होणाऱ्या स्पर्धेतील तीन गटातून प्रत्येकी ४ असे १२ पुरस्कार विजेते विद्यार्थी निवडले जाणार आहेत. त्यांना संध्याकाळी साडेचार वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण होणार आहे.
५००१, ३००१, २००१, १००१ रुपये रोख, सन्माचिन्ह, प्रशस्तिपत्र, कृष्णाकाठ हे पुस्तक भेट म्हणून दिले जाणार आहे. शुक्रवारी जयंती दिवशी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत प्रतिष्ठानने उभारलेल्या यशवंतरावांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाणार आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अशोक पोवार, रमेश मारे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर उपस्थित होते.