कोल्हापूर : यासीन भटकळ हा विशाळगडावर राहिला होता, हे कालच समजले. तो आला असेल तर तो का आला? कोणाकडे राहिला आणि हे सगळे माहिती होते तर मग पाेलिस गप्प का बसले, याची चौकशी करू, अशी ग्वाही देत विशाळगड प्रकरणाची सगळी चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. शाहूप्रेमींनी शांतता राखावी, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, त्या दिवशी संबंधितांनी कोणताही अनुसूचित प्रकार करणार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना ग्वाही दिल्याने पोलिस गाफील राहिल्याचे दिसते. न्याय प्रविष्ट बाब नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया राबवली आहे. या प्रकरणाची मागे कोण आहे, हे सगळे चौकशीनंतर समोर येईल. नुकसानीचे पंचनामे केले असून त्या ४० कुटुंबांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल. आपण योग्य वेळी गजापूरला भेट देणार आहे. मात्र, कायदा सुव्यवस्था कशी राहील, वातावरण शांत कसे राहील, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारच्या दोन घटना या शाहू भूमीत घडल्या आहेत. यामुळे कोल्हापूर बदनाम होत आहे. यासाठी अशा घटना घडू नयेत, यासाठी शाहूप्रेमींनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.
यासीन भटकळ विशाळगडावर आला होता, तर मग पोलिस गप्प का बसले?; हसन मुश्रीफ यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 3:51 PM