गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक गावांतील यात्रा, उत्सव व उरुसावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून अनेक गावांतील यात्रा, उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रम सध्या रद्द केले जात आहेत. त्यामुळे यात्रांच्या हंगामात धार्मिक पूजेचे साहित्य, खेळणी, कपडे, बांगड्या, मिठाई, खाद्यपदार्थ आदी वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या यात्रेतील विक्रेत्यांना गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागात फेब्रुवारी महिन्यापासून यात्रांचा मुख्य हंगाम सुरू होतो. मे महिन्यापर्यंत हा हंगाम असतो. ग्रामीण भागातील या यात्रांच्या हंगामामध्ये यात्रेतील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यात्रा हंगामातील या चार महिन्यांच्या उत्पन्नातूनच बहुतांश विक्रेत्यांच्या वर्षभराचे आर्थिक नियोजन होत असते. त्यामुळे यात्रांचा हा हंगाम या विक्रेत्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा चांगला स्रोत मानला जातो. अनेक विक्रेत्यांच्या कुटुंबीयांचा वर्षभराचा उदरनिर्वाह हा यात्रेमध्ये होणाऱ्या त्यांच्या विक्रीवर अवलंबून असतो; परंतु गेल्यावर्षी ऐन यात्रांच्या हंगामातच कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे शासनाने सर्व यात्रा, उरूस व त्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घातल्याने या यात्रांमधील अनेक छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता.
दरम्यान, दिवाळीनंतर कोरोनाचा कहर कमी आल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत होती. त्यामुळे यावर्षी यात्रा, उरूस तसेच धार्मिक उत्सव पूर्वीप्रमाणे भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु गेल्या एक ते दीड महिन्यापासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा अचानक वाढू लागल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनामुळे यात्रा, उत्सवावर निर्बंध येऊ लागले आहेत. परिणामी, कोरोनाच्या रिटर्न एन्ट्रीने यात्रेतील विक्रेतावर्ग हवालदिल झाला आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही शासनाने यात्रांवर कडक निर्बंध आणल्याने भविष्यातील उदरनिर्वाहासाठी आर्थिक नियोजन कसे करायचे या विवेचनात सध्या हे विक्रेते आहेत.