दुर्गमानवाड येथे विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त खेळेमंडळ व मानकऱ्यांनी पहाटे दिनकर गुरव, शंकर गुरव, विठ्ठल गुरव या पुजाऱ्यांच्या हस्ते देवीला अभिषेक घातला. काकड आरती खेळेमंडळ व मानकऱ्यांनी केली. दिवसभर मंदिर परिसरात शुकशुकाट पसरला होता.
रात्री आठ वाजता देवीच्या मंदिरातून पारंपरिक पद्धतीने वरील मंडळी सबीना घेऊन गैबीपीर येथे गेले. तेथे जाऊन गाऱ्हाणे घालून परत मंदिरात आले. नियमानुसार विविध देवतांची सोंगे काढली व पहाटे श्रीकृष्णाचे सोंग काढून गुलाल खोबरे वाहून सांगता झाली. येथील श्री विठ्ठलाई देवी ही कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या देवीच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनासारखा महाभयानक आजार सर्वत्र पसरत असल्यामुळे भाविकांविना यात्रा उत्सव साजरा झाला आहे.