चंदगड/प्रतिनिधी : महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याचे श्रध्दास्थान असलेल्या चंदगडच्या ग्रामदैवत रवळनाथ देवालयाची यात्रा दिनांक ३ मार्च रोजी भरविण्यात येणार आहे. शासनाने कोरोनाविषयक नियम शिथील करून यात्रा भरविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सचिव आबासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चंदगडच्या तहसीलदारांकडे केली. श्री देव रवळनाथ पब्लिक ट्रस्ट, चंदगडमार्फत श्री देव रवळनाथ देवस्थानच्या वार्षिक यात्रेचे नियोजन केले जाते. यावर्षीची यात्रा दिनांक ३ मार्च रोजी होत आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आला असून, त्यावर प्रतिबंधक लसीकरणही सुरु आहे. श्री देव रवळनाथ हे तीन राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत आहे. या यात्रेमुळे व्यापारी, खेळणी, पाळणे, मिठाई विक्रेते यासह लहानसहान वस्तू विक्री करणारे व्यावसायिक यांचा चरितार्थ चालतो. ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडणे गरजेचे आहे. श्री देव रवळनाथ वार्षिक यात्रा तसेच तालुक्यातील होणाऱ्या माटे, हरे, बागिलगे, कोदाली या प्रमुख यात्रांसह इतर गावांच्या यात्राही निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी शासनाने नियम शिथील करावेत, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. मात्र, शासनाने जाहीर केलेल्या नियमात कोणतीही शिथिलता देण्याचा अधिकार आम्हाला नसून, सामाजिक अंतर राखून कार्यक्रम घ्यावेत, असे तहसीलदार विनोद रणवरे यांनी सांगितले. यावेळी अॅड. व्ही. आर. पाटील, इंद्रजित सावंत-भोसले, रणजित सावंत-भोसले, आदी उपस्थित होते.