जोतिबा : चैत्र यात्रा काळात जास्तीत जास्त भाविकांना स्वच्छतागृहांची सेवा तत्परतेने उपलब्ध करून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रा पूर्वतयारीकरिता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक सुहास वारके, जिल्हा पोलीसप्रमुख अभिनव देशमुख प्रमुख उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने यात्रा कालावधीमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सुचवले. तसेच भाविकांची संख्या लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी स्वत:चे स्वच्छतागृह भाविकांना उपलब्ध करून द्यावे, असेही आवाहन करण्यात आले.
भविकांच्या सोईसाठी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. या टाक्या उपलब्ध करून देण्यासाठी समाजसेवी संघटनांनी व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बैठकीपूर्वी मंदिर परिसराची पाहणी केली. यात्रा काळात मंदिरामध्ये भरपूर आॅक्सिजनयुक्त खेळती हवा राहण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. या बैठकीला पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, प्रांताधिकारी अमित माळी, नायब तहसीलदार अनंत गुरव, देवस्थान समितीचे सहायक सचिव शिवाजी साळवी, देवस्थान समिती अभियंता सुयश देशपांडे, जोतिबा मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, आदी तालुक्यातील अधिकारी व समाजसेवी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जोतिबा मंदिरात चैत्र यात्रा पूर्वतयारी बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी दौलत देसाई. यावेळी पोलीस महासंचालक सुहास वारके, जिल्हा पोलीसप्रमुख अभिनव देशमुख, प्रांताधिकारी अमित माळी, आदी उपस्थित होते.