सरवडे : कोरोनाच्या महामारीमुळे तब्बल दोन वर्षानंतर आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थानचा वार्षिक भंडारा उत्सव व अमावस्या यात्रा मंगळवार २२ मार्च ते शनिवार २ एप्रिल अखेर होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन, कायदा व सुव्यवस्थेसाठी देवस्थान समिती, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी व ग्रामस्थ यांची बैठक पार पडली.
या बैठकीत यात्रा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व विभागाच्या प्रमुखांना सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी येणाऱ्या सर्व भक्तांना दर्शन व महाप्रसाद व उत्सवा दरम्यान अनुचित प्रकार घडू व दुर्घटना घडू नये कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून दक्ष रहावे, सार्वजनिक आरोग्य, पाण्याची सोय, वाहनांचे पार्किंग, पोलीस बंदोबस्त व अन्य स्वयंसेवक यंत्रणा सज्ज करणे, पार्किंग व्यवस्था, मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत यासह सुविधा बाबत चर्चा झाली. कोरोना महामारीबाबतचे नियम व जनजागृतीचे फलक, भक्तांच्या सोयीसाठी जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना करण्यात आल्या.असा आहे उत्सव सोहळाभंडारा उत्सव व हरिनाम सप्ताहाचा २२ मार्च रोजी प्रारंभ, सोमवार २८ मार्च रोजी जागर, मंगळवारी महाप्रसाद होईल. या दोन दिवशी तीन राज्यातून येणा-या सुमारे ३ लाख भाविकांसाठी नियोजन केले जाणार आहे. बुधवार ३० मार्च रोजी श्रींचा पालखी सोहळा, १ एप्रिल रोजी अमावस्या व शनिवारी गुढीपाडवा असल्याने १० दिवस हा उत्सव सोहळा सुरु राहणार आहे.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीस प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसिलदार अश्विनी वरुटे, आरटीओ अधिकारी विजयसिंह भोसले, पोलिस निरीक्षक संजय मोरे, एस. टी. आगार गारगोटी व्यवस्थापक दिलीप ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय धुमाळ, मंडल अधिकारी राहूल शिंदे, तलाठी धनाजी पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले याच्यासह व्यापारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.