राम मगदूम।गडहिंग्लज : यावर्षी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात मिळून सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे किमान २० लाख टन उसाच्या उत्पादनाची शक्यता आहे. एकरी उत्पादन वाढ आणि गाळपासाठी सर्वच कारखान्यांनी विशेष नियोजन केले असले तरी शेतकऱ्याला मात्र आपल्या उसाच्या गाळपाचीच चिंता लागली आहे.
चित्री आणि फाटकवाडी धरण प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर या विभागात ऊस लागवडीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली. मात्र, तोडणी मजुरांची वाणवा कायम असल्यामुळे दरवर्षी सर्वच कारखान्यांना बाहेरील तोडणी मजुरांवर अवलंबून राहावे लागते. दरम्यान, मराठवाड्यातील काही मुकादमाकडून स्थानिक काही वाहनधारक आणि कारखान्यांची फसवणूक झाली. तेव्हापासून ऊस तोडणी-ओढणीच्या कटकटीत वाढ झाली. प्रयत्न करुनही स्थानिक टोळ्या उभ्या राहत नाहीत. त्यामुळे यावर्षी काही कारखान्यांकडून यंत्राद्वारे ऊस तोडणीचा कार्यक्रम राबविला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्याची तयारी सुरू झाली आहे.
तथापि, गडहिंग्लज विभागात अल्पभूधारक असणाºया लहान शेतकºयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यंत्राद्वारे ऊस तोडणीचा कार्यक्रम राबविणे अडचणीचे ठरणार आहे. त्यासाठी खास नियोजनाची आवश्यकता आहे. एकेका भागातील लहान-लहान शेतकºयांच्या उसाला एकत्रित तोड देऊन वाहतुकीची स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. परंतु, वाढीव ऊसक्षेत्र लक्षात घेता यावर्षीपासून यंत्राद्वारे ऊस तोडणीच्या प्रयोगाची शक्यता अधिक आहे.गडहिंग्लज विभागात एकूण पाच साखर कारखाने आहेत. त्यांपैकी चंदगडचा दौलत कारखाना गतवर्षी गाळप करू शकला नाही. येत्या हंगामात तरी तो चालू होईल कीनाही, त्याबद्दल आज काहीचसांगता येत नाही. त्यामुळेच येथील विशेषत: चंदगडचा शेतकरी चिंतेत आहे.
गडहिंग्लज विभागातील कारखान्यांशिवाय संकेश्वर, बेलेवाडीचा संताजी घोरपडे, कागलचा शाहू, हमीदवाड्याचा मंडलिक, बेडकीहाळचा तांबाळे व राधानगरीच्या रिलायबल शुगर्स या कारखान्यांकडेही येथील ऊस जातो. मात्र, रान मोकळे करण्याची घाई आणि वेळेवर व खात्रीशीर तोडणीचा कार्यक्रम राबविला जात नसल्यामुळेच या परिसरातील ऊस उत्पादक भरडला जात आहे. यावर्षी उत्पादन वाढले तरी शेतकरी व कारखानदारांच्या ऊस गाळपाच्या चिंतेतही भर पडली आहे, एवढे मात्र नक्की.