कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात यंदा एका तिथीचा क्षय झाला असून, खंडेनवमी आणि दसरा एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे यंदा नवरात्री नव्हे तर आठच रात्री असणार आहेत. शनिवारी (दि. १७) घटस्थापनेने या उत्सवाला प्रारंभ होत आहे.आदिमाता, दुर्गा या स्त्रीदैवतांची आराधना आणि उपासनेचा कालावधी म्हणून शारदीय नवरात्रौत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महिषासुराशी आठ दिवसांचे घनघोर युद्ध केल्यानंतर देवीने अष्टमीला त्याचा वध करून विजय मिळविला. त्यामुळे या आठ दिवसांत देव्हाऱ्यात अखंड दिवा तेवत असतो. यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवास सुरुवात होत आहे.घटस्थापना, शनिवारी (दि. १७) : शनिवारी घटस्थापनेने नवरात्रौत्सवाची सुरुवात होत आहे. सकाळी नऊ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाई मंदिरात घटस्थापना होईल. घरोघरी देव्हाऱ्यात देवीच्या मूर्तीसमोर घट बसविले जातात. यात मोठ्या ताटात मध्यभागी लोटके ठेवून भोवतीने मातीत धान्य पेरून ते उगवेपर्यंत आठ दिवस काळजी घेतली जाते.त्र्यंबोली यात्रा, ललितापंचमी (दि. २१) : हा नवरात्रौत्सवातील पाचवा दिवस असून या दिवशी अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होऊन सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. यंदा कोरोनामुळे ही पालखी पायी नेण्याऐवजी सजवलेल्या वाहनातून नेण्यात येणार आहे.महाअष्टमी ( दि. २४) : महाअष्टमीला देवीने महिषासुराचा वध केल्याने हा नवरात्रौत्सवातील सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी रात्रभर जागर केला जातो. श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजविलेल्या वाहनात बसून नगरवासीयांच्या भेटीला निघते व नगरप्रदक्षिणा केली जाते. यंदा कोरोनामुळे देवीचा हा धार्मिक विधीदेखील मोठ्या वाहनात उत्सवमूर्ती ठेवून केला जाणार आहे.
खंडेनवमी, विजयादशमी (दि. २५): खंडेनवमीला शस्त्रांची पूजा केली जाते. श्री अंबाबाईची शस्त्रे तसेच जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानी देवीची शस्त्रेदेखील तेथे पूजली जातात. विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला अंबाबाईचा विजयोत्सव साजरा केला जातो. यंदा खंडेनवमी आणि दसरा एकाच दिवशी आहे. सायंकाळी अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीतून दसरा चौकात शाही दसरा सोहळ्यासाठी जाईल.