कोल्हापूर : महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न पूर्णपणे बदलला असून उशिरा येऊन नोव्हेंबर, डिसेंबर लांबण्याची गेल्या दोन वर्षांपासूनची परंपरा यावर्षीदेखील कायम राखली जाणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी वर्तवला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवठ्यात मान्सून सक्रिय होणार असून तत्पूर्वी जून व जुलैमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असणार आहे. आताही राज्यात विशेषत: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात गारपीट वाढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने १ जूनला केरळमध्ये तर ८ जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल आणि सरासरीच्या १०३ टक्के बरसेल असा सुधारित अंदाज वर्तवला आहे. पण नेमका याला छेद देणारा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा. जोहरे यांनी वर्तवला आहे. जाेहरे हे सातत्याने बदलते वातावरण, अवकाळी, गारपीट या पावसाचा भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म अभ्यास करून निरीक्षणे नोंदवत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून ऑगस्टमध्येच सक्रिय झाला होता व १५ नोव्हेंबरपर्यंत लांबला होता. शिवाय त्यांनी गारपिटीचे वर्तवलेले अंदाजदेखील तंतोतंत खरे ठरले होते. यावर्षीदेखील त्यांनी असाच विदर्भ व कोकणात कमी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. यातही जून जुलैमध्ये पाऊस गडगडून येईल. ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत मान्सूनची तीव्रता जास्त राहणार आहे.
चौकट ०१
कोल्हापुरात गारपीट का?
कोल्हापुरात कधीही गारपीट नसे. वळीवात कधीतरी गारांचा पाऊस पडे; पण यावर्षी दोन महिन्याच्या अंतराने भुदरगडमधील धनगरवाडा व कागल तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्यात मुख्यत: नंद्याळमध्ये प्रचंड गारा कोसळून रस्ते व शेते पांढरी शुभ्र बनली. याबाबत जोहरे यांनी ही तर सुरुवात आहे, येथून पुढे सवय करून घ्यावी लागेल, असे मत नोंदवले. वातावरण बदलामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात कुभोनिंब ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात झाली असून येथून पुढे सातत्याने गारपिटीचा सामना करावा लागणार आहे.
चौकट ०२
गारपीट का होते?
बाष्पीभवन वाढल्याचा हा परिणाम आहे. वातावरणात आर्द्रता वाढली असून जमिनीपासून दोन ते १५ किलोमीटर उंचीवर कुभोनिंब ढगांची निर्मिती वाढली आहे. हे ढग वाढण्यामागे कमी झालेली झाडे हे एक महत्त्वाचे कारण आहे. उद्योगधंद्याच्या उत्सर्जनामुळे बाष्पीभवनाची तीव्रता कमी होते, पण सध्या लॉकडाऊनमुळे तेही कमी असल्याने बाष्पीभवन, अभिसरण वाढण्याला चांगलाच हातभार लागला असून उत्सर्जन वाढून त्याचे रूपांतर गारांमध्ये होत असल्याचे निरीक्षणही जोहरे नोंदवतात.
चौकट ०३
पीक पॅटर्न बदलावा लागणार
मान्सून ऑगस्टमध्ये सुरू होऊन तो नोव्हेबर, डिसेंबरपर्यंत लांबेल, असा अंदाज असल्याने पीक पॅटर्नमध्येही आता बदल करावा लागणार असल्याचे जाेहरे सांगतात. पेरणी जूनऐवजी जुलैमध्ये करावी लागणार आहे. पाऊस दोन महिने पुढे सरकला असल्याने त्या अनुषंगाने पीक प्रकार व पेरणी पद्धत निवडावी लागणार आहे.