मंडणगड : राज्यात १ मेपासून शालेय पोषण आहाराची नवीन योजना सुरू केली जाणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंडणगड येथे केली. पोषण आहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची भूमिका योग्य ठरविली आहे. त्यातील वैयक्तिक आरोपांचे खंडन करून न्यायालयाने आपल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडणगड शहरातील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास पंकजा मुंडे यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. जलयुक्त शिवार योजनेमुळे )शेतकऱ्यांच्या जीवनात बदल होत आहे. दुष्काळी परिस्थिती असलेल्या काही ठिकाणी पाणीसाठा वाढून अनेक ठिकाणी विक्रमी उत्पादन झाले आहे. नीती आयोगाने या योजनेचे कौतुक केले आहे. राजस्थानमध्ये याच धर्तीवर योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागातील रस्ते हीच विकासाची लाईफलाईन असल्याने तीस हजार किलोमीटर रस्त्यांचा आराखडा बनविण्यात आला होता. त्यातील अडीच हजार किलोमीटर रस्त्यांचे काम एका वर्षात पूर्ण झाले आहे. राज्य शासनाच्या लोकप्रिय योजनांमध्ये जलयुक्त शिवारनंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा समावेश होतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.पोषण आहार योजनेबाबत आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत राज्य सरकारने घेतलेली भूमिका सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविली आहे. त्यातील भ्रष्टाचाराच्या वैयक्तिक आरोपांचे न्यायालयाने खंडन करून आपल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे राज्यात १ मे २०१७ पासून पोषण आहाराची नवीन योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महादेव जानकर व भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास दादा इदाते, प्रा. विजय कुलकर्णी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, सदस्य संतोष गोवळे, प्रमोद जाधव, उपसभापती स्नेहल सकपाळ, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, प्रणाली चिले, रासप जिल्हाध्यक्ष अशोक पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम इदाते यांनी केले. (प्रतिनिधी)गोपीनाथ मुंडे यांचे संस्कारलोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या शिकवणीनुसार आपण राजकारणात वाटचाल करीत असल्याचे पंकजा मुंडे यांनी आवर्जून सांगितले. समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी काम करीत सर्वसामान्यांची शाबासकी हीच आपली प्रतिमा अखंडपणे जगत राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.ओबीसी मंत्रालयाने दिशा बदलेलराज्य सरकारने इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील राजकारणाची दिशा बदलली आहे. समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी काम करण्याची भूमिका असलेल्या शासनाने जात, धर्म अशा सर्व भेदांना तिलांजली दिली आहे. विरोधकांच्या टीकेनंतरही हे सरकार सकारात्मक काम करीत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
यंदा नवीन शालेय पोषण आहार योजना
By admin | Published: April 26, 2017 11:33 PM