कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रामनवमी मंदिरातील पुजारी व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. यानिमित्त अंबाबाई मंदिर आवारातील राम मंदिरात सकाळी धार्मिक विधी व सायंकाळी पालखी सोहळा काढण्यात आला. यंदा कोरोनामुळे रथोत्सव रद्द करण्यात आला.भगवान श्री रामाचा जन्मोत्सव सोहळा असलेल्या रामनवमीनिमित्त गुढीपाडव्यापासून नवरात्र सुरू होता. रामनवमीला जन्मकाळ सोहळा साजरा केला जातो. यानिमित्त आज (बुधवारी) सकाळी महाभिषेक झाला. त्यानंतर दुपारी १२ वाजता मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत जन्मकाळ-पाळणा झाला.
सायंकाळी पालखी सोहळा झाल्याची माहिती पुजारी सुहास झुरळे, सुरेंद्र झुरळे व अनिल झुरळे यांनी दिली. मंगळवार पेठेतील श्रीराम मंदिरातही मोजक्याच महिलांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा झाला. सध्या कोरोनामुळे कडक संचारबंदी असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही.