आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : मुहूर्ताच्या सौद्याविनाच कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत यंदा पाडव्याचा सण साजरा करण्यात आला. दरवर्षी गुळाबरोबरच हापूस आंब्याचे मोठ्या डामडौलात तीन-चार मुहूर्ताचे सौदे काढले जातात. या औपचारिकतेला फाटा देत समिती प्रशासनाने भपकेबाजीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर बाजार समितीत गुळाची स्थानिकसह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात आवक होते. कोल्हापूरच्या गुऱ्हाळघरांचा विचार केला तर आॅक्टोबरपासून त्याची सुरुवात होते पण काही हौशी गुऱ्हाळमालक सप्टेंबरमध्येच गुऱ्हाळघरे सुरू करून समितीत गुळाची आवक करतात. नवीन गूळ आला म्हणून समिती प्रशासन मुहूर्ताचा सौदा काढते. यासाठी नेतेमंडळीची रेलचेल, डामडौल आणि या कार्यक्रमासाठी हजारो रुपयांची उधळपट्टी ठरलेली असते. गुळाचा हंगाम सुरू होतो न होतो तोपर्यंत दिवाळी पाडवा येतो, पाडव्याच्या मुहुर्तावर असाच डामडौल केला जातो. त्यानंतर येणाऱ्या गुढीपाडव्यालाही पुन्हा तिसऱ्यांदा मुहूर्ताचा सौदा काढला जातो. मुहूर्ताच्या सौद्यात नेतेमंडळींची किमत कमी होऊ नये म्हणून त्या गुळाला उच्चांकी बोली लावली जाते. त्यानंतर हंगाम संपेपर्यंत कधीही गुळाला तेवढा दर मिळत नाही. समितीची परंपरा खंडित करायची नाही म्हणून ती पुढे चालविली जाते. यंदा उसाच्या कमतरेतेमुळे फेबु्रवारी महिन्यातच बहुतांशी गुऱ्हाळघरांच्या चिमण्या थंडावल्या. सध्या समितीत फारच कमी प्रमाणात कर्नाटकातून गुळाची आवक सुरू आहे पण मुहूर्ताचा सौदा न काढता नियमित सौदे सुरू ठेवण्याचा निर्णय समिती प्रशासनाने घेतला. भपकेबाजपणा न करता खर्चात काटकसर करण्याच्या दृष्टीने समितीने उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या सौद्यातील दरदाम असा -आवक दर प्रतिक्विंटल सरासरी दर रुपयात२८६७ रवे ४७०० ते ५१५० ४९००१५१४ बॉक्स ३९०० ते ५१०० ४२००
कोल्हापुरात मुहूर्ताच्या सौद्याविनाच यंदा बाजार समितीचा पाडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2017 6:13 PM