कोल्हापूर : यंदा हापूसबरोबर तोतापुरी आंब्यांची आवक थोडी लवकरच झाली असून, बाजारात पिवळाधमक तोतापुरी आंबा ग्राहकांना भुरळ पाडत आहे. डाळींच्या दरात दर आठवड्याला थोडी-थोडी वाढ होऊ लागली असून, तूरडाळ व हरभरा डाळींचे दर ऐंशीच्या वर गेले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी दर काहीसे वधारले आहेत. रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हापूसच्या दीड हजारांपेक्षा अधिक पेट्या, तर रोज बाजार समितीत आठ हजार बॉक्सची आवक होत आहे. त्याशिवाय रायवळ व पायरी आंब्यांची आवकही सुरू आहे. घाऊक बाजारात हापूस पेटी (चार डझन) सरासरी १५००, तर बॉक्सचा (दोन डझन) दर ३०० रुपये असला तरी किरकोळ बाजारात अजूनही दर चढाच आहे. किरकोळ बाजारात दर ४०० रुपये डझन आहे. त्यामुळे अजून तरी हापूस सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. पायरी व रायवळ आंब्यांची आवकही चांगली आहे. साधारणत: ३० पासून ६० रुपये किलोपर्यंत याचे दर आहेत. कलिंगडांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात काळ्या पाठीची कलिंंगडे २० रुपये, तर हिरव्या पट्ट्याचा दर ४० रुपयांपर्यंत आहे. लिंबूंच्या मागणीत वाढ झाली तरी आवकही चांगली असल्याने १० रुपयांना पाच लिंबू असा दर आहे. एरव्ही मे महिन्यात दाखल होणारा तोतापुरी आंबा यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात आला आहे. पिवळ्याधमक तोतापुरीने ग्राहकांना भुरळ घातली आहे. पाणीटंचाई व कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी दर वाढण्यास सुरुवात झाली असून, ओला वाटाणा यंदा पहिल्यांदाच ६५ रुपयांपर्यंत धडकला आहे. भेंडी, दोडका, कारली, वरण्याचा दर ४० पासून ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. काकडीची आवक वाढल्याने दर ४० रुपयांपर्यंत स्थिर आहे. चटणीचा हंगाम जोरात सुरू असल्याने कोथिंबिरीच्या मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात २० रुपये पेंढी, तर मेथी, पालक पाच रुपये पेंढी आहे. वांगी २० रुपये किलो, तर टोमॅटो १० ते १५ रुपयांपर्यंत आहे. तूरडाळ, हरभरा डाळींच्या दरांत आठवड्याला वाढ होत असून किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे. मसूरडाळ, मटकीचे दर मात्र स्थिर आहेत. सरकी तेल, साखरेच्या दरांत फारसा चढउतार झालेला नाही. लाल मिरचीची आवक यंदा चांगली असली तरी तिच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. ब्याडगीबरोबर घंटुर मिरचीला अधिक मागणी आहे. ज्वारीचे दर काहीसे स्थिर आहेत. किलोचा दर २२ ते ३० रुपये आहे.
पिवळाधमक ‘तोतापुरी’ बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 1:11 AM