सदाशिव मोरे
आजरा : येमेकोंड (ता. आजरा) येथे ओढ्याचे पाणी शेतात घुसल्याने अंदाजे १० एकरांवरील भातपीक वाहून गेले आहे. काळधोंड नावाच्या जंगलातून हा ओढा वाहतो. अतिवृष्टीने या ओढ्याने आपला मार्ग बदलला असून उताराची जमीन असल्याने सध्या भातपिकात धबधबा तयार झाला आहे.
आजरा नेसरी मार्गावरील प्रवासी व काही हौशी नागरिक हा धबधबा पाहण्यासाठी येत आहेत.
गेल्या पंचवीस वर्षांत दोन दिवसांतील उच्चांकी पाऊस जुलै महिन्यात झाला. त्याचा फटका सर्वांत जास्त शेतकरी वर्गाला बसला आहे. क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने ओढ्याने दिशा बदलली आहे; तर रोपलागण केलेली भातपिके अतिवृष्टीच्या प्रवाहातून वाहून गेली आहेत. ओढ्याचे पाणी शेतात घुसल्याने दगड, गोटे, वाळू, माती पिकावर जाऊन पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी साहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून पंचनामे सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहेत. उच्चांकी झालेला पाऊस व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांची भरपाई तातडीने मिळणे गरजेचे आहे.
येमेकोंडमधील शेतकऱ्यांचे काळधोंड जंगलाच्या खाली ओढ्यालगत भाताचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक वर्षी या भागात भाताची रोपलागण केली जाते. २३ व २४ जुलैच्या पावसाने हा ओढा चांगुना रेडेकर, मारुती कांबळे, शंकर पंडित, बबन कांबळे, अशोक कांबळे यांच्या शेतात घुसला व रोपलागण केलेले भातपीक होत्याचे नव्हते झाले. जवळपास दहा एकरांमधील भाताचे नुकसान झाले आहे. काळधोंड नावाच्या जंगलातच २४ जुलैला ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने या ओढ्याने आपले पात्रच बदलले व शेतकऱ्यांनी मशागत करून केलेल्या पिकावर वरवंटा फिरविला.
१० आजरा
येमेकोंड (ता. आजरा) येथील ओढ्याने पात्र बदलल्यामुळे भातपिकात धबधबा तयार झाला आहे.