(विश्र्वास पाटील)कोल्हापूर : होय, मी लोकसभा निवडणूकीसाठी जरुर इच्छूक होतो परंतू ते आता नव्हे, १९९८ ला असे स्पष्ट शब्दात सांगून कोल्हापूरच्या शाहू महाराज यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरु झालेल्या चर्चेला शनिवारी सकाळी पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूरात २५ ऑगस्टला दसरा चौकात जाहीर सभा होत आहे. त्या सभेचे अध्यक्षस्थान शाहू महाराज यांनी स्विकारले आहे. तो धागा पकडून तेच राष्ट्रवादीचे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवार असतील अशी चर्चा सुरु झाली. सकाळी येथील शाहू स्मारक भवनातील फोटोग्राफर्स असोसिशनच्या कार्यक्रम झाल्यावर पत्रकारांनी त्यांना याबध्दल विचारले. त्यावर ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या सभेचे निमंत्रण मी स्विकारले आहे. त्यामुळे त्या सभेला मी उपस्थित राहणार याबाबत दुमत नाही. पण राष्ट्रवादी च्या उमेदवारीसाठी मी इच्छक आहे असे जे म्हणतात, त्यांनाच जावून तुम्ही त्याबध्दल विचारा. पत्रकारांनी त्यांना तुम्ही महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी इच्छूक आहात का अशी थेटच विचारणा केल्यावर ते क्षणभर थांबले आणि म्हणाले, होय मी इच्छूक होतो परंतू आता नव्हे, १९९८ च्या निवडणूकीत.
लोकसभेच्या १९९८ च्या निवडणूकीत शिवसेनेने विक्रमसिंह घाटगे यांना उमेदवारी दिली. तेव्हा राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता होती. त्यामुळे शिवसेनेची जोरात हवा होती. त्यावेळी शाहू महाराज हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत गांधी मैदानात झालेल्या जाहीर सभेला व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला अशीही चर्चा होती. परंतू त्यावेळी शिवसेनेतून घाटगे यांना उमेदवारी मिळाली. त्याच्या उमेदवारीचा विषय तिथेच बंद झाला. त्यानंतर त्यांच्या नावांची उमेदवार म्हणून अधूनमधून चर्चा होते परंतू त्यांची निवडणूक लढवण्याची तयारी नाही. त्यांनी नुकताच वयाचा अमृतमहोत्सव साजरा केला आहे शिवाय छत्रपती घराणे म्हणून कोल्हापूर त्यांना मोठा सन्मान देत आहे. त्यामुळे तो मिळत असताना पक्षीय राजकारणात पडू नये असाही विचार त्यामागे आहेच. परंतू स्व:ता शाहू महाराज यांचा सुरुवातीपासून पुरोगामी विचारधाराच पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे सध्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्याविरोधात ते उघडपणे भूमिका घेत आहेत.