एकनाथ पाटील - कोल्हापूर -गेल्या तीन वर्षांमध्ये भरदिवसा गोळीबार, खून, चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, अपहरण, लैंगिक अत्याचार आणि लूटमारीच्या वाढत्या प्रकारांनी त्रस्त झालेले असुरक्षित कोल्हापूरकर... जयंती, उत्सवांच्या नावाखाली सक्तीच्या वर्गणीमुळे बेजार झालेले व्यापारी... किरकोळ कारणावरून संवेदनशील, अतिसंवेदनशील भागांत होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांनी भयभीत झालेले रहिवासी... असे चित्र कोल्हापूरचे झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिक स्वत:ला सुरक्षित समजत नसल्याचे चित्र आहे. त्यावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला असता ‘होय, आम्हाला सुरक्षाच हवी...!’ अशी अपेक्षा अनेक कोल्हापूरकरांनी व्यक्त केली. खून, खुनाचा प्रयत्न, चेन स्नॅचिंग, घरफोडी, हाणामाऱ्या, अपहरण, लैंगिक अत्याचार, धार्मिक तेढ, आदी घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर खुनांची मालिकाच सुरू झाली आहे. धडावेगळे शिर नसलेले मुडदे माळरानावर टाकले जात आहेत. घरफोड्यांच्या प्रमाणात तर मोठी वाढ झाली आहे. सोनसाखळी पळविण्याच्या घटना तर नित्याच्याच आहेत. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारांचे प्रमाणही वाढू लागले आहे. शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्या युवतींचे अपहरण हीसुद्धा एक चिंतेची बाब बनली आहे. पीडित युवतींचे माता-पिता आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा अथवा आशेचा किरणही पोलीस ठाण्यात, चौकीत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. एखादी घटना घडल्यानंतर तत्काळ फिर्याद नोंदवून घेण्याचे कष्ट कोणी घेताना दिसत नाहीत. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलीस ठाण्यांची बांधणी करताना सर्वच पोलीस ठाण्यांत नवे अधिकारी नियुक्त केले आहेत. अधिकारी नवे आणि कर्मचारी जुने अशा परिस्थितीत अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न काही जुन्या कर्मचाऱ्यांना खटकत आहेत. वरकमाई पूर्णत: बंद झाल्याने ही फळी अधिकाऱ्यांच्या विरोधात गेली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसू लागल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले. काही अधिकाऱ्यांत गुन्हे उघडकीस आणण्यावरून एकमेकांत स्पर्धा सुरू आहे. चांगले काम करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पाय ओढणारीही यंत्रणा पोलीस दलात कार्यरत आहे. पोलीस दलातील या अंतर्गत कुरघोड्यांमुळे सुरक्षेचे बारा वाजले आहेत. निर्मनुष्य वसाहतीत ‘नो सायरन’शहराचा विस्तार वाढलेला आहे. चारही बाजूंनी वसाहती वाढत चालल्या आहेत. बऱ्याच वसाहती, नगरांमध्ये अपार्टमेंट परिसरात दिव्यांची सोय नाही. या भागातील नागरिकांनी रात्रगस्त करणाऱ्या गाड्यांचे सायरन कधी ऐकलेच नसतील. रात्रगस्तीच्या पोलिसांनी ज्या-त्या भागात फिरत असताना सायरन वाजवून नागरिकांना जागरूक करावे, अशी अपेक्षा आहे.रात्रगस्तीची रचना बदलण्याची गरजसध्या रात्रगस्त अकरा ते पहाटे पाच अशी आहे. वास्तविक रात्री १२ पर्यंत बहुतांश लोक जागे असतात. चित्रपटगृहांमधून बाहेर पडलेले रसिक, कंपनी, कारखान्यांमधून घरी परतणारे कामगार अथवा रात्री मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वेस्थानकामधून बाहेर पडणारे प्रवासी यांची वर्दळ सुरू असते. घरफोडीची वेळ ही मध्यरात्री एक ते पहाटे चार अशी आहे.यावेळी पोलीस रस्त्यावर नसून ठाण्यात किंवा जीपमध्ये साखरझोपेत असतात. या वेळेतच रात्रगस्त घालण्याची सक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या स्तरावर केली पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. ५नको तिथे नाकाबंदी जिथे नाकाबंदी हवी, तिथे जरूर केली पाहिजे; परंतु ज्या ठिकाणी नाकाबंदीची गरज नाही, अशा ठिकाणी ती केली जात आहे. पोलीस कोणत्या ठिकाणी नाकाबंदी करतात त्याची माहिती गुन्हेगारांना आहे. त्यामुळे नाकाबंदी करूनही चेन स्नॅचर किंवा चोरटे सापडत नाहीत.
होय, आम्हाला सुरक्षाच हवी..!
By admin | Published: May 20, 2015 12:43 AM