संदीप आडनाईक कोल्हापूर : जगभरात आजचा २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने योगासनाचे महत्त्व सांगणारे अनेक कार्यक्रम आज, बुधवारी कोल्हापुरात होत आहेत; परंतु कोरोनाकाळात योगासनाकडे जितक्या गांभीर्याने पाहिले जात होते, तितक्या गांभीर्याने अजूनही याकडे पाहिले जात नाही. असे असले तरीही वर्षभर अनेकजण याकडे वळलेले आहेत. जिम, रंकाळ्यासारख्या निसर्गरम्य परिसरात योगा करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.कोल्हापुरात आर्ट ऑफ लिव्हिंग, योगधाम, पतंजली यांसारख्या संस्थांच्या पुढाकाराने योगासनाचे धडे वर्षभर घेतले जातात. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘मानवतेसाठी योग’ अशी आहे. योगाच्या विविध शैलींमध्ये शारीरिक मुद्रा, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि ध्यान किंवा विश्रांती यांचा समावेश होतो.योग करण्याचे फायदे : शरीराची लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य हे योगाचे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत.लवचिकता : योग तुमची हालचाल आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतो, ज्यामुळे तुमच्या शारीरिक वेदना कमी होण्यास आणि एकूण गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.मजबूत स्नायू : योगामुळे मुख्य स्नायूंसह मुद्रा आणि संतुलन सुधारू शकते.तणाव कमी होतो : योगामुळे मन आणि शरीर शांत होऊन तणाव कमी होण्यास मदत होते.झोप सुधारते : योगामुळे शरीर आणि मन शांत होऊन शांत झोप घेता येऊ शकते.ऊर्जा वाढते : योगासने रक्ताभिसरण सुधारून, थकवा कमी करून ऊर्जापातळी वाढविण्यास मदत करतात.वजन कमी होणे : योगाने कॅलरी जाळल्या जातात. चयापचय सुधारते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.मानसिक संतुलन सुधारते : योगामुळे चिंता, नैराश्य आणि तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते.
प्रांजल रेवंडकर करतात मल्लखांबातून योगसरावप्रांजल रेवंडकर पारंपरिक भारतीय खेळ मल्लखांबचा राष्ट्रीय खेळाडू आहे. गतवर्षी त्याने रंकाळ्याच्या कठड्यावर मयूरासन करून मल्लखांब आणि योगासनांचा सराव करत समन्वय साधला. त्याच्या मते मल्लखांब हे योग आणि जिम्नॅस्टिक्सचे एक अद्वितीय संयोजन आहे. गुरुत्त्वाकर्षणाविरुद्ध खेळला जाणारा हा एकमेव खेळ आहे. या खेळाच्या योगाभ्यासाने सामर्थ्य, लवचिकता आणि संतुलन मिळवण्यासाठी मदत होते.