कोल्हापूर : सकाळच्या आल्हाददायक वातावरणात मैदानावर जमलेले विद्यार्थी, हातांमध्ये चटई घेवून मैदानावर जाणारे शिबीरार्थी .आणि या सर्वांना योगाचे तंत्रशुद्ध धडे देणारे योगशिक्षक अशा उत्साही वातावरणात शाळा, महाविद्यालये, विविध वसाहती, मैदाने, सांस्कृतिक हॉलमध्ये शुक्रवारी ‘ जागतिक योग दिन ’शहरात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहराच्या विविध भागात जनजागृती फेरी व योगासन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.यात शहरातील विविध शाळांसह संस्थांनी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात शाळकरी मुलामुलींसह युवक, उद्योजक, व्यावसाायिक, खेळाडू, नोकरदार, मान्यवर व ज्येष्ठ नागरीक सहभागी झाले होते.विवेकानंद महाविद्यालय
नागाळा पार्क येथील विवेकानंद महाविद्यालयात शुक्रवारी जागतिक योग दिनानिमित्त एन.सी.सी. व एन.एस.एस विभागातर्फे सकाळी सात ते आठ या दरम्यान जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे एन.सी.सी. व एन.एस.एस.च्या ८० विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने एकत्रितरित्या योगासने व प्राणायम केले. या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते झाले.
यावेळी एन.सी.सी. कोल्हापूर विभागाचे गु्रप कमांडर ब्रिगेडियर आर.बी.डोग्रा, ५ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.चे कोल्हापूर विभागाचे कमांडिंग आॅफीसर कर्नल आर.बी.होला (सेना मेडल), कर्नल साांघ, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. एम.एम.कारंजकर व गोखले गुरूजी यांनी मार्गदर्शन केले. योगासनाची सांगता झाल्यानंतर कॉलेजच्यावतीने ताराबाई पार्क परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली.