युनूस शेख -- इस्लामपूर --सुलेखनाची कला अवगत करायची असेल, तर कष्ट उपसावे लागतील. ठाण मांडून मनातील कल्पना कागदावर उतरवाव्या लागतील. त्यासाठी शॉर्टकट नाही. ही कला जगाच्या पाठीवर कुठेही विकली जाऊ शकते. यातून जीवन घडवायचे असेल, तर त्यासाठी रियाज हवा. एकाग्रतेला मन, मनगट आणि मेंदूतील आत्मविश्वास व बोटातील कौशल्याची जोड दिल्यास सुलेखनातून उत्तम कलाकृती निर्माण होतात, असा सल्ला सुलेखनातील दादा माणूस अच्युत पालव यांनी बुधवारी दिला.येथील राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालयातर्फे राज्य कला संचालनालयाच्या मदतीने आयोजित केलेल्या ५६ व्या राज्य कला प्रदर्शनात राज्यभरातून आलेल्या उदयोन्मुख कलाकारांना प्रसिद्ध सुलेखनकार पालव यांच्या रंगरेषांच्या फटकाऱ्यातून साकारलेल्या सुबक कलाकृतींच्या आविष्काराची सुखद अनुभूती मिळाली.राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या सभागृहात बसलेले सुलेखनकार अच्युत पालव आणि त्यांच्याभोवती गोल रिंगण करून खाली बसलेले आणि टेबलवर उभे राहून जीव डोळ्यात आणून पालवांचा उत्कट कलाविष्कार पाहणारे उदयोन्मुख कलाकार, असे विश्व रंगले होते. पालवांच्या प्रत्येक फटकाऱ्यातून आकार घेणारी नेत्रदीपक आणि मनोहारी कलाकृती पाहताना प्रत्येकजण देहभान हरपून गेला होता. सुलेखनातील जिवंतपणा, आकर्षकता आणि सुबकता दाखविताना पालव यांनी अधिकारवाणीने काही सूचनाही केल्या.सुलेखनात करिअर करायचे असेल, तर कष्टाची तयारी हवी. आपल्या संकल्पना स्पष्ट हव्यात. स्वत:ला मार्केटमध्ये सिध्द करण्याचा आत्मविश्वास हवा. रोजच्या सरावातून हे सर्व शक्य आहे. फक्त गरज आहे ती या सुलेखन कलेशी तादात्म्य पावण्याची, असा सल्ला त्यांनी दिला.मांडी घालून बसलेले अच्युत पालव प्रत्येक फटकाऱ्यातून सुलेखनातील दादागिरी उलगडून दाखवत होते. सुलेखनावरील त्यांची निष्ठा आणि समर्पण वृत्ती त्यांच्या देहबोलीत होती. विद्यार्थ्यांच्या कोंडाळ्यातील वावर स्वत:प्रती आत्मविश्वास प्रकट करणारा होता. अवती-भोवती बसलेल्या उद्याच्या कलाकारांना सुलेखनातील बाळकडू देणारा हा अवलिया जवळपास साडेतीन तास ठाण मांडून बसला होता.
अच्युत पालव यांनी दिला सुलेखनाचा यशोमंत्र
By admin | Published: January 06, 2016 11:49 PM