लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकशाहीतील चारही स्तंभाकडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही तेंव्हा शेवटचा न्याय हा रस्त्यावर मिळतो. म्हणूनच आता जनतेने जात, धर्म, पक्ष विसरुन रस्त्यावर उतरले तरच देशातील सध्याची परिस्थिती बदलेल, अशा विश्वास ज्येष्ठ विचारवंत, शेतकरी नेते आणि स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी बुधवारी कोल्हापुरात बोलताना व्यक्त केला.
राहुल गांधी यांची सुरु असणारी ‘भारत जोडो यात्रा’ ही कोणा एक पक्षाची यात्रा नसून सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीत बसून देशाचे संविधान तोडणाऱ्या प्रवृत्ती विरुध्द सर्वसामान्य जनेतेची भारत जोडण्याची हाक देणारी यात्रा आहे. या यात्रेद्वारे उतरुन एकत्र लढूया, असे आवाहनही यादव यांनी यावेळी केले.
कॉग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या ‘नफरत छोडो, भारत जोडो’यात्रेला पाठींबा देण्याकरीता योगेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘समता भूमी कोल्हापूर ते नांदेड’ अशा दहा दिवसांच्या जनसंवाद यात्रेचा प्रारंभ बुधवारी ऐतिहासिक बिंदू चौकातून झाला. त्यानंतर पहिली सभा शाहू स्मारक भवनात झाली, त्यावेळी यादव मार्गदर्शन करत होते. डाव्या चळवळीत काम करणारे अनेक कार्यकर्ते या जनसंवाद यात्रेत तसेच सभेत सहभागी झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दिलीप पवार होते.
देशात जेंव्हा कधी असाधारण परिस्थिती येते, तेंव्हा सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांवर तसेच जनतेवर असाधारण काम करण्याची वेळ येते. सध्या देशाचे संविधान तोडण्याचे, लोकशाही मुल्ये उद्धवस्त करण्याचे, गांधीचा देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे. तीन हजार वर्षाचा देशाचा इतिहास गाडण्याचे प्रयत्न सत्तेत बसलेल्या भाजप तसेच ‘आरएसएस’कडून होत आहे. म्हणूनच जनतेने एकत्रपणे रस्त्यावर उतरुन संविधानाचे रक्षण करावे लागणार आहे, असे यादव म्हणाले.
लोकशाहीत चारही स्तंभाकडून जनतेला न्याय मिळत नाही. जो अन्यायाविरोधात आवाज उठवतो त्याच्या मागे ईडी, सीबीआय लावले जाते. कारागृहात टाकले जाते. हा सरकारी दहशतवाद आहे. एकीकडे सत्ताधिशांच्या विरोधात बोलले की कारवाई केली जाते, पण देशातील मुस्लीमांविरोधात बोलले तरी काहीच कारवाई केली जात नाही. म्हणूनच आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागणार आहे. एकत्रितपणे लढलो तर त्याच यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी भरत रसाळे, बाबासो नदाफ यांनी जनसंवाद यात्रेची माहिती सांगितली. दिलीप पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. तर बाबासाहेब देवकर यांनी आभार मानले. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, व्यंकाप्पा भोसले, सुभाष लोमटे, आर. के. पोवार, भरत लाटकर, सचिन चव्हाण, दुर्वास कदम,शारंगधर देशमुख सतिश कांबळे, रघुनाथ कांबळे उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"