कोल्हापूर : पन्नास हजार रुपयांच्या खंडणीसाठी युवकास चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार जवाहरनगर परिसरात यल्लाम्मा देवीच्या मंदिरानजीक चव्हाण कॉलनी रोडवर घडला. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आरसी गॅँगचा योगेश मानसिंग पाटील (वय ३८, रा. यल्लम्मा मंदिरानजीक, जवाहरनगर) याला शुक्रवारी अटक केली. त्याला आज, रविवारपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.
याबाबत माहिती अशी की, जवाहरनगर मधील एक चोवीस वर्षीय युवक हा महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी अभ्यास करीत आहे. त्याचे वडीलही शासकीय सेवक आहेत. दि. १० एप्रिल रोजी युवक फिरण्यास गेला होता. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संशयित योगेश पाटील हा आपल्या मोपेडवरून आला व त्याने त्या युवकास जवाहरनगर परिसरातील अडविले. तसेच पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर एमपीएससीची परीक्षा देण्याअगोदरच तुला ठार मारीन अशी धमकी दिली. त्यावेळी त्या युवकाने दि. १४ व २१ एप्रिल रोजी एकूण १० हजार रुपये खंडणी दिली. त्यानंतर दि. २९ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो युवक चव्हाण कॉलनीतील आपल्या काकांकडे चालत जात होता. त्यावेळी संशयित योगेश पाटील याने त्याला परिसरातील नगरसेवकाच्या घरासमोर अडवून चाकूचा धाक दाखवला.
उर्वरित ४० हजार रुपये दे अन्यथा तुला ठार मारीन अशी धमकी दिल्याची तक्रार युवकाने राजारामपुरी पोलिसांत दिली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समाधान घुगे यांनी तपास करून काही तासांतच संशयित योगेश पाटील याला खंडणीप्रकरणी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दि. ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.