निपाणी : खडकलाट येथील ग्रामदैवत गैबीपीर देवाच्या उरुसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती सांगलीचा सुधाकर गुंडू व काका पवार आखाडा पुणे येथील योगेश पवार यांच्यात झाली. यामध्ये अवघ्या १५व्या मिनिटाला सुधाकर गुंडू याने योगेश पवारला मच्छिगोता डावाने अस्मान दाखविले. सुधाकर गुंडू याला एक लाख २० हजार रुपये रोख व ढाल बक्षीस देण्यात आली.दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती शिवाजी पाटील (मोतीबाग, कोल्हापूर) व बाला रफीक (न्यू मोतीबाग, कोल्हापूर) यांच्यात झाली. यामध्ये अवघ्या एका मिनिटात बाला रफीकने शिवाजी पाटील याला हप्ता डावावर चितपट करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूर मोतीबागचा विजय पाटील व सांगलीतील संभा सुडके यांच्यात लावण्यात आली. १७ व्या मिनिटाला ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती इचलकरंजी येथील प्रकाश नरुटे व कोल्हापूर मोतीबागच्या विठ्ठल कारंडे यांच्यात लावण्यात आली. केवळ चौथ्या मिनिटाला निकाली डावावर नरुटेने कारंडेला चितपट केले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती वृषभ पट्टणकुडे व इचलकरंजीच्या आण्णा गायकवाड यांच्यात झाली. वृषभने ही कुस्ती जिंकली. महिला कुस्ती स्पर्धेत इचलकरंजीच्या तेजस्विनी सातपुते हिने हेमा मोहितेवर पाचव्या मिनिटांत एकडाक डावावर विजय मिळविला. यावेळी अमृत भोसले, रियाज पठाण, मल्लिकार्जुन कोरी, शिवय्या सातय्या स्वामी, शिवबसव महास्वामी, हालशुगरचे संचालक विश्वनाथ कमते, सागर मायाण्णा, वीरेंद्र पाटील, सदाशिव माळी, ननू शेख, आदी उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्या कुस्तीपटूंना मल्लिकार्जुन कोरी, विश्वनाथ कमते, रियाज पठाण, राजू हेगान्ना, सदाशिव माळी, मनोहर गावडे, जिन्नाप्पा मगदूम, विलास माळगे, संजय चौगुले, अशोक यादव, बंडा सरदार, आण्णाप्पा खोत व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कोथळीतील शंकर पुजारी यांनी कुस्तीचे समालोचन केले. बजरंग अब्दागिरे यांनी हलगीवादन केले.
सुधाकर गुंडूकडून योगेश पवार चीत
By admin | Published: June 10, 2015 11:56 PM