इंदुमती गणेश ।कोल्हापूर : क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचा चातुर्मास कालावधीत कोल्हापूरकरांना तब्बल पाच महिन्यांचा सहवास लाभला. महाराजांनी दीक्षा घेतली त्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यावेळी कोल्हापूरकरांनी हा त्यांचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम भव्य प्रमाणात साजरा केला. या कालावधीत त्यांच्या प्रवचनांनी नागरिकांना सुज्ञ करण्याचे काम केले. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर कोल्हापुरात यशस्वी उपचार करण्यात आले; त्यामुळे कोल्हापूरबद्दल त्यांना अतीव प्रेम होते. कोल्हापूर सोडताना त्यांनी ‘मैं डोली में आया था; आज चलकर जा रहा हूॅँ’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
सांसारिक व्यक्तींच्या मनामध्येही आपल्या कडव्या प्रवचनांद्वारे अंजन घालणारे राष्ट्रसंत तरुणसागर महाराज २२ जुलै २००७ ला चातुर्मासानिमित्त पहिल्यांदा कोल्हापुरात आले. रुईकर कॉलनी येथील उद्योगपती शरद व स्वाती शेटे यांच्याकडे महाराजांच्या निवासाची सोय करण्यात आली होती. येथील मैदानात भव्य चातुर्मास कार्यक्रम व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. उद्योगपती महावीर गाट व सध्याच्या हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले होते. महाराजांच्या पाच महिन्यांच्या वास्तव्याच्या कालावधीत कोल्हापूरचे वातावरण अगदी भारलेले होते. त्यांचे आई-वडीलही कोल्हापुरात आल्यानंतर त्यांचा कोल्हापुरी पद्धतीने सत्कार करण्यात आला होता. महाराज दर रविवारी सकाळी नऊ ते दहाया वेळेत श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करीत. साक्षात सरस्वतीचा वास असणाऱ्या त्यांच्या वाणीचा प्रभाव इतका होता की, केवळ जैन धर्मातीलच नव्हे, तर अन्य जातिधर्मांतील कर्नाटकसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकही या प्रवचनाला उपस्थित असत. मंडपात बसायलाही जागा मिळत नसे.
त्यांनी श्री अंबाबाई मंदिरासह दिगंबर समाजातील सर्व मंदिरांना भेटी दिल्या. शरद शेटे यांच्या परिवाराने त्यांची खूप सेवा केली. परत जाताना महाराजांनी शरद शेटे, डॉ. संतोष प्रभू यांच्या वैद्यकीय पथकाचे आभार मानले, त्यांना आशीर्वाद दिला. कोल्हापुरातून मी बरा होऊन निघालो, या भावनेतून त्यांचे या शहरावर विशेष प्रेम होते. कोल्हापुरातून कोणी भेटायला गेले की त्यांना खूप आनंद व्हायचा, ते कोल्हापूरच्या आठवणी सांगत. आपली साहित्यसंपदा त्यांना पाठवत.कोल्हापुरात यशस्वी उपचारतरुणसागर महाराज कोल्हापुरात येण्यापूर्वी त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याने त्यांचे डोलीतूनच आगमन झाले होते. येथे आल्यानंतर त्यांना अधिकच त्रास जाणवू लागला. दरम्यान, जैन समाजातील प्रमुख व्यक्तींनी महाराजांना मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. संतोष प्रभू यांचे नाव सुचविले. महाराजांनी आपल्या आजाराबद्दल गुरू आचार्य पुष्पदंतसागर महाराज यांच्याशी चर्चा केली. त्यावर गुरूंनी महाराजांना तुम्ही दीक्षा छेद करून उपचार घ्या; आपण पुन्हा दीक्षाविधी देऊया, असे सुचविले होते. मात्र, महाराजांनी त्यास नकार दिला व डॉक्टरांना अट घातली की, मी संतांच्या माझ्या नियमात राहूनच उपचार घेईन. त्यामुळे महाराजांच्या निवासस्थानातील एका खोलीला ‘आयसीयू’ करण्यात आले. डॉ. संतोष प्रभू, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर यांच्यासह चार डॉक्टरांच्या पथकाने महाराजांवर उपचार केले. डोलीतून आलेले महाराज पाच महिन्यांनंतर मात्र स्वत: चालत पुढील प्रवासाला गेले.बिंदू चौकातून निरोप...एखाद्या संत-मुनींना कोल्हापूरकरांनी भव्य कार्यक्रमाद्वारे निरोप देणे ही घटना पहिल्यांदा तरुणसागर महाराजांबाबतीत घडली. चातुर्मास कार्यक्रम संपल्यानंतर चातुर्मास समिती व कोल्हापूरकरांनी बिंदू चौकात भव्य सभेचे आयोजन केले. खचाखच भरलेल्या या चौकातून महाराजांनी कोल्हापूरकरांना शेवटचे आशीर्वचन दिले.वचनमैं भगवान महावीर को मंदिर के चौराहे पे लाना चाहता हूॅँ।मैं सिखाने नहीं,जगाने आया हूॅँ।आज क्रांती के बिना शांती संभव नहीं।‘लोग क्या कहेंगे’ यह सबसे बडा रोग है।मंदिर में भक्त कम,भिखारी ज्यादा।पर्यावरण के प्रदूषण से ज्यादा खतरनाक विचारों का प्रदूषण है।विनयांजली कार्यक्रम आजक्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त जैन बांधवांच्यावतीने आज, रविवारी तरुणसागर महाराजांना विनयांजली अर्पण करण्यात येणार आहे.या विनयांजली अर्पण कार्यक्रमास जैन बांधव व कोल्हापूरकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पद्माकर कापसे यांनी केले आहे.
तरुणाईशी संवादतरुणसागर महाराज देवधर्माबद्दल सांगतानाच दैनंदिन गोष्टींचा आधार घेऊन चुकीच्या प्रवृत्तीवर थेट टीका करायचे. सुखी, समाधानी जीवन जगण्याची गुरुकिल्लीच ते देत; त्यामुळे त्यांच्या प्रवचनांना तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित राहतअसे.
तरुणसागर महाराज धर्माचा खरा अर्थ आपल्या कुशल वक्तृत्वातून समाजाला पटवून देत होते. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना मठाकडून ‘प्रवचनपरमेष्ठी’ पदवीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने समस्त देशाचे नुकसान झाले आहे.- स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन स्वामीजी (लक्ष्मीसेन जैन मठ)
‘तरुणवाणी’च्या निमित्ताने मला तरुणसागर महाराजांचे आशीर्वाद लाभले. मी या लेखनाबद्दल स्वत:ला धन्य समजते. तुम्ही जैन धर्माच्या प्रचाराचे काम करीत आहात, अशाच अखंड लिहीत रहा, असे आशीर्वचन त्यांनी दिले.- डॉ. सुषमा रोटेएका संताने आमच्या घरात पाच महिने वास्तव्य करणे, आम्हाला त्यांची सेवा करता येणे, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या काळात आमचे घर देवत्व, भक्ती आणि अलौकिक शांतीने भारलेले होते.- स्वाती शेटे