कोल्हापूर : आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणात आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर ‘योगा’ करणे गरजेचे आहे. योगाने आपले शरीर आणि मानसिक आरोग्यही उत्तम राहते; पण योग शास्त्रोक्त पद्धतीने कसा करावा, त्यासाठी कोणती दिनचर्या अवलंबावी, याची ‘सखीं’ना माहिती मिळावी, यासाठी ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने शनिवारी (दि. १) सूर्या कॉन्फरन्स हॉल, लकी बझार येथे दुपारी ४.३० वाजता ‘परिपूर्ण आरोग्यासाठी योगशास्त्र’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मान्यताप्राप्त योग प्रशिक्षक अर्चना बडे या मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय जीवनशैली व आयुर्वेदशास्त्रात ‘योगा’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या योगाचे फायदे आता नागरिकांना कळू लागल्याने पुन्हा योग, आयुर्वेद यांकडे लोकांचा कल वाढला आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे.
नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तर योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय आहे.
सगळ्या कुटुंबाची काळजी वाहणाऱ्या महिला स्वत:च्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असतात. कुटुंबाची घडी व्यवस्थित चालायची असेल तर महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे व जीवनशैलीकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. नियमित योगा केल्याने मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून तुम्ही जर प्राणायाम आणि मेडिटेशन करीत असाल तर, पूर्ण दिवस तुम्हाला नक्कीच आनंद आणि उत्साही वाटेल आणि सर्व कौटुंबिक जबाबदाºया पार पाडण्यासाठी तुम्ही सक्षम राहाल.
या कार्यशाळेत मार्गदर्शिका अर्चना बडे योगाचे महत्त्व आपल्याला सांगणार आहेत. सर्व सखींसाठी हा कार्यक्रम मोफत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत सखी मंच’तर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ९७३००७४०२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.अर्चना बडे या मान्यताप्राप्त योग प्रशिक्षक आहेत. त्यांनी आजवर अनेक योग कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे. पुण्यातील नामांकित संस्थेतून त्यांनी योगाचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्या सध्या हर्डीकर मल्टिस्पेशालिटी क्लिनिक येथे न्यूट्रीजिनोमिक काउन्सेलर म्हणून काम करतात. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीतील वाढते हार्मोनल इम्बॅलन्सिंग आणि वजन अशा समस्यांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे.