कोल्हापूर : प्रत्येक निवडणुकीत जनतेला गृहीत धरणाऱ्या मंडळींविरोधात जिल्ह्यात खदखद असून स्वाभिमानी कार्यकर्ता पेटून उठला आहे. सभासदांच्या उत्स्फूर्त पाठबळावर सर्वच्या सर्व नऊ जागांवर आमचा विजय पक्का असल्याचा विश्वास विरोधी परिवर्तन आघाडीचे नेते खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मंडलिक म्हणाले, बँकेचीनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच आमची इच्छा होती. सगळ्यांना सोबत घेत असताना शिवसेनेला दुर्लक्षित करण्याची भूमिका घेतल्याने त्याला विरोध करत आमची भूमिका घेऊन सभासदांसमोर गेलो, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आम्ही बँकेवर कधीच टीका केली नाही, आम्ही सगळ्यांनी बँक चांगली चालवली ती अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी आम्ही रिंगणात उतरलो आहे. यावेळी माजी आमदार संपतराव पवार, आमदार प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके, ॲड. सुरेश कुराडे, प्रा. शहाजी कांबळे, अजित नरके उपस्थित होते.
आमच्यामुळेच ‘तुम्ही’ बिनविरोध
वेळ मिळाला असता तर, विकास संस्था गटातील बाराही ठिकाणी ताकदीचे उमेदवार दिले असते. विकास संस्थांच्या सहा जागा बिनविरोध झाल्या, त्या आमच्यामुळेच, बिनविरोधच्या टिमक्या कोणी वाजवू नयेत, असा टोला खासदार मंडलिक यांनी लगावला.
बिनविरोध झालेले माणुसकी म्हणून मदत करतील
शिरोळ तालुक्यात दोन्ही गट आम्हाला मदत करणार आहेत. विकास संस्था गटातून बिनविरोध झालेेले सहाही नेते माणुसकी म्हणून आम्हालाच मदत करतील, असे मंडलिक यांनी सांगितले.
शिवसेनेशिवाय कोणाला अध्यक्ष होता येणार नाही
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर अनेकांनी दावे केले असले तरी शिवसेनेच्या मदतीशिवाय कोणालाही अध्यक्ष होता येणार नाही. जिल्हा बँकेच्या राजकारणात शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे मंडलिक यांनी सांगितले.
राज्यपालांनी सही केली तर, स्वीकृत
जिल्हा बँकेचे संचालक मंडळ २१ वरुन २५ करण्याचा निर्णय राज्यशासनाने केला आहे, त्याला दोन्ही सभागृहाची मान्यता मिळाल्यानंतर राज्यपालांची सही व्हावी लागणार. या वाढीव स्वीकृत जागेचे गाजर शिवसेनेला दाखवल्याची टीका चंद्रदीप नरके यांनी केली.
त्यांच्या जोड्याला नव्हे पायालाच राजकारण
राजकीय जोडे बाहेर काढून जिल्हा बँकेचा कारभार केल्याचा डांगोरा पिटत आहेत. मात्र तुमच्या पायालाच राजकारण चिकटल्याने जोडे बाहेर काढून काय उपयोग असा टोला संपतराव पवार यांनी लगावला.