विजय कदम
कणेरी : एखाद्या घरात कोरोनाचा रुग्ण आढळला की त्या कुटुंबाचे पूर्ण जीवनचक्रच बदलून जाते. उपचार घेणाऱ्याला कुटुंबाची काळजी तर कुटुंबाला रुग्णाची. त्यातच कोरोना रुग्णांच्या कुटुंबाला अनेकजण दूर ठेवण्याचाच प्रयत्न करतात. अशावेळी त्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कणेरी (ता. करवीर) येथील कोरोना रुग्णांचे कुटुंब मात्र याला अपवाद आहेत. येथील युवकांनी कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना दूध, भाजीपाल्यासह आवश्यक वस्तू मोफत घरपोहच पुरवित त्यांचा त्रास तर वाचविलाच, शिवाय सामाजिक बांधिलकीची रेषाही अधिक गडद केली.
कणेरी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती व तरुण मंडळे यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद शाळेत कोविड अलगीकरण केंद्र सुरू केले आहे. या अलगीकरण कक्षात कमी लक्षणे असलेले काेरोना रुग्ण ठेवण्यात आले आहेत. येथील रुग्णांनाही कणेरीतील युवक सेवा देत आहेत. शिवाय जे रुग्ण हॉस्पिटल वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, अशा रुग्णांच्या कुटुंबीयालाही मदतीचा हात या युवकांकडून दिला जात आहे. अतुल पाटील, सुशोम फाउंडेशनचे मिथुन पाटील, निशांत पाटील, तुषार देसाई, योगेश शिंदे, त्रिशूल पाटील, वैभव पाटील, संजय पाटील, विनोद पाटील, उदय चोरडे, केतन नाईक, अभिमन्यू शिंदे हे युवक कोरोना रुग्ण असलेल्यांच्या घरी जाऊन दूध, भाजीपाला, त्यांना लागणारे साहित्य मोफत पुरवित आहेत. येथील अलगीकरण कक्षाला समर्थ मित्र मंडळाकडून १२ बेड देण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब माळी व उदय चोरेडे हे अलगीकरण कक्षातील रुग्णांना जेवण व नाष्टा देत आहेत. अमित पाटील यांनी ओषधे, सॅनिटायझर दिले असून अमोल चव्हाण, त्रिशूल पाटील, यांनी गावात मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. क्रांती तरुण मंडळाच्यावतीने घरोघरी सॅनिटायझर बॉटल्स, खोकल्याच्या औषधांचे वाटप केले.
फोटो : १४ कणेरी मदत
सुशोम फाउंडेशनच्यावतीने कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना दूध, भाजीपाला देण्यात येत आहे.