कोल्हापूर : येथील प्रस्थापित राजकारण्यांना जनता कंटाळली आहे. म्हणूनच आपला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या सर्व प्रभागांत आपचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. त्याची तयारी केली आहे. आपकडे सर्व यंत्रणा तयार आहे. विकासाचे मॉडेल आहे; पण निवडणुकीत वाटण्यासाठी पैसे नाहीत, असे आम आदमी पक्षाचे (आप) प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, पैसे वाटून सत्ता मिळवता येते, असे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांना वाटते; पण कोल्हापूरचे मतदार शहाणे आहेत. ते या महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमदेवारांना निवडून देतील, मंदिरे उघडा म्हणून आंदोलन करणारे भाजप पूरग्रस्तांच्या मागण्यांप्रश्नी गप्प का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देशात राजर्षी शाहू महाराजांच्या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शहरात तीन महिन्यांचा महापौर करून नेत्यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. विकासकामातील निधीमधील १८ टक्के टक्केवारी खुलेेपणे मागितल्याने विकास खुंटला आहे. यामुळे शहराच्या विकासाचे वाटोळे झाले आहे.
नदीपात्रात आणि काठावर बेकायदेशीर बांधकाम झाले आहे. बांधकाम करणाऱ्या बिल्डरांनी नेत्यांना वाटा दिला आहे. त्यामुळे नेते नदीच्या पाण्याला वाट करून देत नाहीत. परिणामी, प्रत्येक वर्षी कोल्हापूर शहराला महापुराचा फटका बसत आहे. महापालिकेत टक्केवारी फोफावली आहे. विकासकामांवर प्रत्यक्षात विकास निधी केवळ ३० टक्केच खर्च होत आहे. उर्वरित ७० टक्के पैसे टक्केवारीवर खर्च होत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी आपचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मंध्यान, विजय कुंभार, धनंजय शिंदे यांनी आपची भूमिका मांडली. संदीप देसाई, नीलेश रेडेकर, उत्तम पाटील उपस्थित होते.