लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची पातळी याचबरोबर पाच वर्षांत लोकसभेत प्रतिनिधीने केलेल्या कामकाजाचा अहवाल, या अनुषंगाने निवडणूक प्रचारात विविध मुद्द्यांचा समावेश असतो. प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करण्याची एकही संधी सोडली जात नाही. जनतेचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोषणा आणि आपल्या कामगिरीसंदर्भात उमेदवार प्रभावीपणे मांडणी करीत असतात. खासदार उदयसिंगराव गायकवाड यांनी सलग पाचवेळा संसदेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांच्या कर्तृत्वाची नोंद पक्षाने घेतली होती. राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम पाहिले होते, अशी पार्श्वभूमी असली, तरी मौनी खासदार अशा स्वरूपाची बोचरी टीका निवडणूक प्रचाराच्या काळात विरोधकांकडून सातत्याने होत असे. त्याला उदयसिंगराव यांनी तेवढ्याच ताकदीने दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे.मौनी खासदार म्हणून माझ्यावर टीका-टिप्पणी केली जाते. मधु दंडवते संसदेत सातत्याने लोकशाहीने दिलेल्या संसदेतील आयुधांचा वापर करून प्रश्न मांडत असतात. त्यांची संख्या शेकड्यात असते. त्याचा संदर्भ देऊन उदयसिंगराव यांनी प्रश्न केला की, माझ्यावर मौनी खासदार म्हणून टीका होते. खासदार मधु दंडवते यांनी संसदेत १00 प्रश्न विचारले. मी फक्त पाचच प्रश्न विचारले. माझे सर्व प्रश्न मार्गी लागले. मधु दंडवतेंचा एकही प्रश्न मार्गी लागला नाही. आता मला सांगा दोघांपैकी जनतेच्या हितासाठी कोणता खासदार महत्त्वाचा. अधिक प्रश्न विचारून त्यातील एकही प्रश्न सुटत नसेल, तर त्याचा जनतेला फायदा काय? उलट जनतेच्या जिव्हाळ्याचे काही मोजके प्रश्न मांडून ते मार्गी लावले, तर जनतेला दिलासा मिळू शकतो. मौनी खासदार म्हणून टीका करणाऱ्यांनी वरील वास्तव लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.उदयसिंगरावांनी मौनी खासदार या टीकेला वरीलप्रमाणे प्रभावी उत्तर देऊन आपल्यावरील आरोप परतवून लावले होते. यापूर्वीच्या निवडणुकीत होणारी राष्ट्रीय चर्चा, आंतरराष्ट्रीय प्रश्न, शासनाचे धोरण या अनुषंगाने प्रबोधनात्मक होत असे. भाषणांना मोठी गर्दी असायची. अलीकडे मात्र जनतेचे प्रश्न आणि प्रबोधनाचा विषय प्रचारातून गायब झालेला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना वापरण्यात येणाºया भाषेचा स्तरही इतका खालावला आहे की, कोणी कोणाचा मान-सन्मान ठेवायला तयारच नाही; त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनासुद्धा प्रतिनिधी निवडताना एक प्रकारचे आव्हान वाटते आहे.लोकशाहीत मताचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेतून तो मिळाला आहे. त्याचा योग्य वापर करून योग्य प्रतिनिधीची निवड करणे आजच्या निवडणूक काळातील प्रचाराच्या गदारोळात कठीण होऊन बसल्याची सामान्य मतदारांची प्रतिक्रिया आहे.सुभाष धुमे, ज्येष्ठ पत्रकार
तुम्हीच सांगा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:28 AM