आॅनलाईन लोकमतवैभववाडी (सिंधुदुर्ग),दि. २ : भुईबावडा घाटातील दरीत तिशीतील अनोळखी तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह शनिवारी सायंकाळी आढळला. मृताच्या गळ्यात गाठ मारलेले सफेद रंगाचे कापड आढळून आले. त्यामुळे तरुणाचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून मृतदेह सुमारे २0 दिवसांपुर्वीचा असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. वाय. महारनूर यांनी स्पष्ट केले. मृतदेह घटनास्थळाहून हलविण्याच्या स्थितीत नसल्याने शवविच्छेदन करुन तेथेच दफन करण्यात आला. या घटनेमुळे भुईबावडा व गगनबावडा परिसरात खळबळ उडाली आहे.गगनबावडा येथील इलेक्ट्रिकचे काम करणारा व्यवसायिक शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास या घाटातून भुईबावडा येथे निघाला होता. भुईबावड्यापासून सुमारे ७ कि.मी.अंतरावरील रिंगेवाडीनजिक काजरकडा येथे त्याला दुगंर्धी आली. त्याने दरीत डोकावून पाहिले असता कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्याबाबत त्यांनी रस्ता कामगार दिगंबर देसाई यांना माहिती दिली.देसाई यांनी पोलीस पाटील प्रल्हाद पावले यांना घाटातील कल्पना दिली. पावले यांच्या माहीतीनुसार भुईबावडा दुरक्षेत्राचे उपनिरीक्षक एम. व्ही. चौकेकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.अंधार झाल्यामुळे झाल्याने पोलिसांना रात्रभर घटनास्थळी मृतदेहाची राखण करावी लागली. सकाळी वैभववाडीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. साळुंके सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मृताच्या अंगावर फक्त काळ्या रंगाची चड्डी होती. मृतदेह पुर्णपणे कुजल्याने तेथून दुसरीकडे हलविणे अशक्य होते. त्यामुळे घटनास्थळीच डा. सी वाय. महारनूर यांनी शवविच्छेदन केल्यावर तेथेच मृतदेह दफन करण्यात आला. डॉ. महारनूर यांनी मृत तरुण २५ त े३५ च्या दरम्यानचा असून गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. साळुके या प्रकरणाचा तपास करीत आहेत.तीन वर्षे गेली मृतदेहाविनापश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या प्रमुख घाटांपैकी भुईबावडा हा एक घाटमार्ग आहे. परंतु या घाटातून वर्दळीचे प्रमाण कमी असून रात्रीच्या वेळी भुईबावडा घाटमार्ग काहिसा निर्मनुष्य असतो. त्यामुळे हा घाटमार्ग गुन्हेगारांना फायद्याचा ठरत आहे. या घाटात मागील १५ वर्षात ७-८ बेवारस मृतदेह आढळून आले. त्यातील एकाची ओळख पटली. गेल्या तीन वर्षांत या घाटात एकही मृतदेह आढळून आलेला नव्हता. शनिवारी कुजलेला मृतदेह आढळून आल्याने मात्र खळबळ उडाली असून या मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलीसांपुढे आव्हान आहे.
भुईबावडा घाटातील दरीत तरुणांचा कुजलेला मृतदेह
By admin | Published: April 02, 2017 6:00 PM