कोल्हापूर : रंकाळा स्टॅँड येथे मोटारसायकल पार्क करून मोबाईल रिचार्ज मारण्यासाठी गेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोघा तरुणांनी मोटारसायकलीच्या युटिलिटी बॉक्समधील एक लाख ३५ हजारांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दत्तात्रय पंडित पाटील (वय ३३, रा. माजनाळ, ता. पन्हाळा) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुरुवारी (दि. १) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पाटील आणि त्याचा मित्र प्रतीक कामानिमित्त गुरुवारी दुपारी कोल्हापुरात आले होते. त्यांनी मोटारसायकलच्या युटिलिटी बॉक्समध्ये एक लाख ३५ हजारांची रोकड कापडी पिशवीत ठेवली होती. त्यांनी रंकाळा स्टॅँड येथे मोटारसायकल (एमएच ०९, बीजी ४८६४) पार्क केली होती. त्याचा मित्र प्रतीक हा स्टॅँडसमोरील मोबाईल शॉपीमध्ये रिचार्ज मारण्यासाठी गेला. पाटील स्टॅँडवरील स्वच्छतागृहात गेले. त्या वेळी मोटारसायकलवरून दोन अनोळखी तरुण आले. त्यांतील एका तरुणाने पाटील यांच्या मोटारसायकलीच्या युटिलिटी बॉक्समधील कापडी पिशवीतील एक लाख ३५ हजारांची रोकड लंपास केली. त्यामध्ये रोकडसह पासबुक, धनादेश, तारण पावत्याही लंपास केल्या.
पाटील आणि त्याचा मित्र प्रतीक काही वेळाने परत आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी रंकाळा स्टॅँड परिसरात नागरिकांकडे चौकशी केली. स्थानकातील एस.टी.चे अधिकारी आणि काही प्रवाशांकडेही चौकशी केली. मात्र रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्याद दाखल केली. दरम्यान, जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने रंकाळा, गंगावेश, रंकाळा टॉवर, ताराबाई पार्क परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. पाटील यांचा पाठलाग करून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला आहे.