कोल्हापूर : कॉँक्रीट मिक्सर ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर चौकात गुरुवारी सकाळी घडली. अमितराज बाळू पोवार (वय २५, रा. उजळाईवाडी तलावाजवळ, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. रस्त्यातील खड्डा चुकविताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर कॉँक्रीट मिक्सर ट्रकचा चालक विजयानंद रामचंद्र वाघमारे (४५, रा. चरण, ता. शिराळा, जि. सांगली ) पसार झाला होता. दुपारी त्याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.अमितराज पोवार व त्याचा जयसिंगपूरचा मित्र इम्रान जमादार हे दोघे गुरुवारी सकाळी स्टेशन रोडवरून दसरा चौक या मार्गाकडे वेगवेगळ्या दुचाकींवरून निघाले होते. व्हीनस कॉर्नर येथे सिग्नलमुळे ते दोघे थांबले. सिग्नल सुरू झाला आणि ते दोघे पुढे गेले; यानंतर सिग्नल बंद झाला. या दरम्यानच सिग्नल तोडून पाठीमागून वेगाने कॉँक्रीट मिक्सर ट्रक आला. या ट्रकच्या पाठीमागील चाकात अमितराज बाळू पोवार हा दुचाकीस्वार सापडला. त्याच्या डोक्याच्या एका बाजूवरून ट्रकचे चाक गेले. त्यात तो जागीच मृत झाला. अपघातानंतर चौकात असलेले वाहतूक शाखेचे पोलिस आणि नागरिक जमा झाले. नागरिकांची गर्दी वाढल्याचे पाहून कॉँक्रीट मिक्सर ट्रकचालक पसार झाला. या अपघातामध्ये दुचाकीच्या पाठीमागील भागाचा चक्काचूर झाला. घटनेनंतर नागरिकांसह मित्रांनी अमितराज पोवारला सीपीआर रुग्णालयात नेले. दरम्यान, हा प्रकार समजताच सरनोबतवाडी येथील त्याच्या नातेवाइकांसह त्याचे मित्र ‘सीपीआर’मध्ये आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.अमितराजचा मित्रपरिवार मोठाअमितराज पोवार हा विवाहित होता. तो मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका कंपनीत यापूर्वी काम करीत होता. महिन्यापूर्वी त्याला मुलगा झाला आहे. तो सध्या इलेक्ट्रिक मीटर टेस्टिंग सेटिंगचे काम करीत होता. गुरुवारी त्याच्या सहकाऱ्यांची व्हीनस कॉर्नर येथील एका हॉटेलमध्ये या संदर्भात बैठक होती. या बैठकीनंतर अमितराज पोवारसह मित्र ताराबाई पार्कातील ‘महावितरण’च्या कार्यालयात जाणार होते. त्याचा मित्रपरिवार मोठा होता, असे त्याच्या मित्रांनी ‘सीपीआर’मध्ये पत्रकारांना सांगितले.आईचा आक्रोश...अमितराज पोवार याचा मृत्यू झाल्याचे समजताच सीपीआरमध्ये त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला. त्याचबरोबर नातेवाईकांना व मित्रपरिवारला अश्रू अनावर झाले. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत होती.रस्ता सुरक्षा सप्ताहातच बळीदरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह प्रशासनातर्फे घेतला जातो. नऊ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू झाला आहे. प्रशासन सर्व माध्यमातून याची जनजागृती करण्यात येत आहे. हा सप्ताह सुरु असतानाच गुरुवारी व्हीनस कॉर्नर चौकात अपघातामध्ये उजळाईवाडीतील एका तरुणाचा बळी गेला.माणूस गेला अन् रस्ता केलाव्हीनस कॉर्नर येथे सकाळी झालेल्या अपघाताच्या परिसरातील मार्गावरील खड्डे मुजविण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून सुरू होती. रात्री अकराच्या सुमारास यूथ बँकेजवळील आणि व्हीनस कॉर्नर ते कोंडाओळ मार्गावरील खड्डे हे डांबरीकरणाने मुजविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, हे काम रात्री ११.५० वाजता पूर्ण झाले. एका तरुणाचा बळी घेतल्यानंतर महापालिका यंत्रणेला जाग आली. हेच खड्डे यापूर्वी मुजविले असते तर या तरुणाचा जीव वाचला असता, अशी चर्चा नागरिकांत सुरू होती. चालक ताब्यात : अपघातप्रकरणी काँक्रीट मिक्सर ट्रकचालक संशयित विजयानंद रामचंद्र वाघमारे (वय ४५, रा. चरण, ता. शिराळा, जि. सांगली) याला दुपारी शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. याची नोंद पोलिसांत झाली आहे.
कॉँक्रीट मिक्सरच्या धडकेत तरुण ठार
By admin | Published: January 13, 2017 1:01 AM