कोल्हापूर : खासगी सावकारीतून युवकाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला, त्याबाबत तक्रारीवरून सर्जेराव श्रीपती मांगुरे (रा. टाकाळा, राजारामपुरी) याच्यावर मारहाण व खासगी सावकारीचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला. मारहाणीची तक्रार प्रीतेश प्रकाश मुळीक (वय ३०, रा. राजारामपुरी २ री गल्ली) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका बेकर्समध्ये प्रीतेश मुळीक हे कामास आहेत. त्यांच्या वडिलांचे राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत नाश्ता सेंटर आहे. या सेंटरवर प्रीतेशची मांगुरे याच्याशी ओळख झाली. घराचे डिपॉझीट देण्यासाठी प्रीतेशला ३० हजार रुपयांची आवश्यकता होती. हे पैसे प्रीतेशने मांगुरे याच्याकडून दरमहा १२ टक्के व्याजाने घेतले. ठरलेल्या व्याजानुसार जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे ७२०० रुपये व्याज दिले; पण त्यानंतर कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये प्रीतेशला व्याज देणे शक्य झाले नाही; पण जूनमध्ये व्याजापोटी प्रीतेशने मांगुरे याला आठ हजार रुपये दिले. वारंवार व्याज देणे जमत नसलल्याने प्रीतेशने पत्नीचे दागिने एका फायनान्स कंपनीकडे ठेवून त्यातून एक लाख १० हजार रुपये घेतले. त्यापैकी ३० हजार रुपये त्याने मांगुरे याला परत केले; पण पैसे परत देऊनही मांगुरे याने व्याजापोटीचा तगादा सुरूच ठेवला. त्यामुळे प्रीतेशने पुन्हा ६३०० रुपये दिले, तसेच पुन्हा पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितले; पण त्यानंतर शनिवारी मांगुरे हा प्रीतेश काम करीत असलेल्या बेकरीमध्ये गेला, तेथे व्याजाचे पैसे दिल्याशिवाय सोडणार नसल्याची धमकी देत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर प्रीतेशला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. शनिवारी रात्री उशिरा प्रीतेशने दिलेल्या तक्रारीवरून सर्जेराव मांगुरे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.