कोल्हापूर : अनैतिक संबंधाचा संशय व आर्थिक देवाण-घेवाणीवरून सागर अशोक कांबळे (वय २५, रा. आळते, ता. हातकणगंले) याचा २०१६ ला खून झाला होता. या प्रकरणी आरोपी हरीष शरद दाभाडे (२९, रा. साठेनगर, आळते) यास चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद नागलकर यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी काम पाहिले.खटल्याची पार्श्वभूमी अशी, मृत सागर कांबळे हा आरोपी हरीष दाभाडे याचा मामेभाऊ आहे. त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण व अनैतिक संबंधाच्या कारणावरून वाद होता. ३१ मार्च २०१६ रोजी सायंकाळी पाच वाजता दोघांत भांडण झाले.
यावेळी हरीष याने आपल्या खिशातून चाकू काढून सागरच्या पोटात सपासप वार केले. पोट व छातीवर वर्मी घाव बसल्याने सागर गंभीर जखमी झाला. मित्र व नातेवाइकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सीपीआर रुग्णालयात आणले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.हातकणंगले पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक सी. बी. भालके यांनी तपास करून आरोपपत्र न्यायालयात पाठवले होते. प्रारंभी सरकारी वकील एस. एम. पाटील यांनी काम पाहिले, पण त्यानंतर हे काम जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांच्याकडे आले.
नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी नेताजी कांबळे, प्रत्यक्षदर्शी अभिजित घाटगे, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश नागलकर यांनी आरोपी हरीष दाभाडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.