कोल्हापूर : अशोकराव चव्हाण हे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते, त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना धक्का आहे. मात्र, अशा प्रसंगाला सामोरे जात आमच्या सारखे तरुण आमदार एकसंध राहून कॉंग्रेसची ही लढाई जिवंत ठेवू, असा विश्वास कॉंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. अशोकराव चव्हाण यांचा हा व्यक्तिगत निर्णय असू शकतो, दिवसभरात कॉंग्रेस आमदारांशी आम्ही संपर्क केला असता, कॉंग्रेसची लढाई पुढे नेण्याची भावना त्यांनी व्यक्त केल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.आमदार पाटील म्हणाले, अशा प्रकारच्या घटनांमुळे पक्षात चिंतेचे वातावरण आहे, हे नाकारता येत नाही. आमची दुसरी पिढी कॉंग्रेसचे प्रामाणिकपणे काम करत आहे. नव्या पिढीला कॉंग्रेसला सक्षमपणे पुढे घेऊन जावे लागणार आहे. राज्यात कॉंग्रेससह महाविकास आघाडीला खूप चांगले वातावरण असल्याचे कॉंग्रेस आमदारांचे म्हणणे आहे. याउलट, भाजपमधील मूळच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. विधानपरिषदेच्या जागा भरल्या जात नाहीत, मंत्रिमंडळाचा विस्तारात संधी मिळत नाही, आता राज्यसभेत किती निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांना संधी मिळते हेही समजेल. यावेळी ‘गोकुळ’ चे संचालक बाबासाहेब चौगले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत आदी उपस्थित होते.महायुती जनतेला मान्यच नाहीजनमाणसात गेल्यानंतर मतप्रवाह लक्षात येतो. महायुती जनतेलाच मान्य नाही. देशात एक-दोन राज्यात काही वेगळे वातावरण असेल पण महाराष्ट्रातील जनतेचा मूड वेगळा आहे, ते आगामी लोकसभा निवडणुकीत दिसेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केले.भाजपने वातावरण बिघडवलेफोडाफोडी करुन ही महाराष्ट्रातील लोकसभेचा सर्व्हे आपल्या बाजूने येत नसल्याचे भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम सुरु असल्याची शंका येत असल्याची टीका आमदार पाटील यांनी केली.
तरुण आमदार एकसंध राहून लढाई जिवंत ठेवू - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 6:17 PM