म्हाकवे : गरिबी ही कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीच असते. नियोजन,संघटन,नेतृत्व आणि कौशल्य या चतुसुस्त्रीची जोड असेल तर यश हे निश्चित मिळते. युवकांनो डॉल्बी,धाबा संस्कृती आणि राजकारणापलीकडे जावून स्वतःला सिद्ध करून दाखवा, असे आवाहन प्रा.मधुकर पाटील यांनी केले.
केनवडे (ता. कागल) येथील शेतकरी कुटुंबातील कृष्णात पाटील या तरुणाने सीए परीक्षेत यश मिळविल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील वंदना सुतार होत्या. कृष्णातची गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. प्रास्ताविक माजी सरपंच दत्ता पाटील-केनवडेकर यांनी केले. शाहू साखरचे संचालक डॉ. डी. एस. पाटील, फौजदार बी. ए. तळेकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शहाजी पाटील, डी. डी. पाटील, तुकाराम मगदूम,आनंदराव तळेकर, कृष्णात एकशिंगे, धोंडिराम एकशिंगे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. संभाजी मांडरेकर यांनी आभार मानले.