कोल्हापूर : चांगल्या व्यसनाशिवाय माणूस जगू शकत नाही, अथवा यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही चांगल्या गोष्टीचा ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी स्वत:ला लावून घ्यायला हवे असे मत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर यांच्यावतीने बुधवारी 'आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त' आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सयाजी शिंदे म्हणाले की, कोणत्याही गोष्टीचे व्यसन अर्थात ध्यास लागल्याशिवाय माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही. आजपर्यंत यशस्वी झालेल्या व्यक्ती यामुळेच यशस्वी झालेल्या आहेत. एचआयव्ही व कोरोना हे विषाणू आहेत. एचआयव्हीच्या नियंत्रणासाठी यापूर्वीही युवक पुढे आलेले आहेत.
सध्या कोरोना विषाणू बाबतीतही काही गैरसमज आहेत. त्यामुळे कलंक भेदभाव सारख्या घटना घडतात. कलंक व भेदभाव नष्ट करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यायला हवा. राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांचा सिंहाचा वाटा असून, वृक्षसंवर्धन, वाचन यासारखे छंद जोपासून त्यांचे व्यसन लावून घेऊन, या क्षेत्रांमध्येही युवकांनी अग्रेसर व्हावे. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर म्हणाल्या, एच. आय. व्ही. मध्ये युवक हा महत्त्वाचा घटक आहे. एचआयव्ही संसर्गितांमध्ये युवकांची संख्या ही लक्षणीय आहे १५ ते ४९ हा गट महत्त्वाचा मानला जातो. युवकांनी याबाबत सजग राहून शास्त्रीय माहितीचा आधार घेण्याची आवश्यकता आहे. मकरंद चौधरी, विनायक देसाई, संदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.