कोल्हापूर : एकीकडे रोजगार नसल्याची ओरड सुरू असताना दुसरीकडे रोजगार उपलब्ध करूनही अनेक तरुण त्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र कोल्हापुरात गुरुवारी पाहायला मिळाले. जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरुवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध प्रकारच्या ६ कंपन्यांमध्ये ३५७ जागा रिक्त होत्या. यामध्ये ९२ उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखत दिली. यामध्ये ६२ जणांची प्राथमिक, तर १५ जणांची अंतिम निवड करण्यात आली. जिल्ह्यातील ६ कंपन्यांमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, टेक्निशियन, हेल्पर, सीएनसी ऑपरेटर, साइट सुपरवायझर, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह अशा विविध पदांच्या जागा रिक्त होत्या. यासाठी हा रोजगार मेळावा घेण्यात आला. यासाठी आठवी ते एमबीएपर्यंत शैक्षणिक पात्रता होती. सदर बाजार परिसरातील जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात कंपनीच्या प्रतिनिधींकडून या मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान, रिक्त जागा जास्त असल्या तरी कंपन्यांना कौशल्याधारित उमेदवारांची गरज असते. मात्र, असे उमेदवार मिळत नसल्याने जागा रिक्त राहत आहेत. जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याला तुलनेने अधिक प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी सांगितले.मोठ्या शहराचे फॅडकोल्हापूर जिल्ह्यात आयटीआयची प्रत्येक तालुक्यात शासकीय कॉलेज आहेत. शिवाय कोल्हापूर शहरातही तीन हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयटीआय कॉलेज आहे. येथून प्रत्येकवर्षी हजारो विद्यार्थी कौशल्याची पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र, या विद्यार्थ्यांना कोल्हापूरपेक्षा पुणे किंवा मुंबई येथील कंपन्या अधिक खुणावतात. कोल्हापूरपेक्षा अधिक पगार या शहरांमध्ये मिळतो, त्यामुळे हे विद्यार्थी कोल्हापूरच्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्यास तितकेसे उत्सुक नसल्याचे दिसते. त्यामुळे येथील कंपन्यांना कौशल्याधारित विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र आहे.
३५७ जागा, आले ९२; निवडले १५ जण; कोल्हापुरात रोजगार मेळाव्याकडे तरुणांची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:26 PM