कोल्हापूर : प्रचंड उत्साही, उच्चशिक्षित, मदतीलाही तितकीच पुढे धावणारी अन् स्वप्न घेऊन जगणारी.. पण डेंग्यू झाल्याचे निमित्त झाले अन् ताप थेट डोक्यात गेल्याने उमद्या तरुणीला अवघ्या वयाच्या तेवीसाव्या वर्षी मृत्यूने गाठल्याची धक्कादायक घटना कंदलगाव (ता.करवीर) येथे रविवारी घडली. ऋतुजा संभाजी पाटील असे या तरुणीचे नाव. ऋतुजा हिला बुधवारी (दि.१९) हलकासा ताप आल्याने कुटुंबीयांनी तिला कंदलगावमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार घेतल्यानंतर तिचा ताप काहीसा कमी झाला. मात्र, गरुवारी ताप वाढल्याने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. मात्र, ताप थेट डोक्यात गेल्याने तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश आले नाही. अखेर रविवारी (दि. २३) सायंकाळी तिचे निधन झाले. वडील महापालिकेत कंत्राटी कर्मचारी तर आई गृहिणी. मात्र, याही परिस्थितीत ऋतुजा हिने कॉमर्स कॉलेजमधून बी.कॉम व एम.कॉमचे शिक्षण पूर्ण करत कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले होते. घरातील सर्वाधिक शिकलेली मुलगी असल्याने तिनेही कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करताना सर्वच भावंडांना शिक्षणासाठी मदत केली होती. अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगत तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू केला होता. मात्र, नियतीलाच हे मान्य नसल्याने डेंग्यूच्या रुपात आलेल्या काळानेच तिचा हा उत्साही प्रवास थांबवला. तिच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ व चुलते असा मोठा परिवार आहे.
कोल्हापुरात 'डेंग्यू'मुळे युवतीचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 12:39 PM