कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक व आपल्यात राजकीय मतभेद असल्याची उघड कबुली थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली, तर महादेवराव महाडिक यांच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीचा संदर्भ देत आजरा तालुक्यातील ‘तिलारी’ नदीचा प्रवाह बदलणे आता शक्य नसल्याचे सांगत त्यांनी आपली राजकीय दिशाही स्पष्ट केली. भिमा कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. व्यासपीठावर महादेवराव महाडिक व आमदार हसन मुश्रीफ असल्याने राजकीय जुगलबंदी पाहावयास मिळणार, अशी अटकळ होती; पण पवार यांच्यासमोर ते एकमेकांवर टोलेबाजी करण्याचे धाडस करतील, असे वाटत नव्हते. तरीही महादेवराव महाडिक यांनी मुश्रीफ यांना डिवचल्याने थोडक्यात टोलेबाजी झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांमुळे जिल्हा समृद्ध झाल्याचे सांगत महादेवराव महाडिक म्हणाले, जिल्ह्यात सोळा नद्या आहेत. त्यातील पंधरा पूर्वेला वाहतात; पण एकच नदी पश्चिमेला वाहते. हसन मुश्रीफ यांनी पश्चिमेच्या नदीला पूर्वेला वळविण्यास सांगितले होते; पण त्यांना अद्याप जमलेले नाही. त्यांनी नेत्यांच्या डोक्यात घातले तर जिल्हा आणखी समृद्ध होईल. हाच धागा पकडत मुश्रीफ म्हणाले, महाडिक साहेबांना शेतीसह इतर क्षेत्रांतील ज्ञान चांगले आहे. पूर्वेकडे वाहणारी आजरा तालुक्यातील ‘तिलारी’ नदी उलटी वाहते. तिचा प्रवाह बदलणे शक्य नाही. निसर्गापुढे आपलेही काही चालत नसल्याचा टोला त्यांनी हाणला. अरुंधती महाडिक यांनी बचत गटांची केलेली बांधणीही कौतुकास्पद आहे. महाडिक यांच्याशी आपले राजकीय मतभेद आहेत; पण चांगल्या कामासाठी नेहमी सहकार्य राहील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. नोटाबंदीवर बोलणे उचित नाहीजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या तोंडावर आपल्या भाषणाची सांगता नोटाबंदीवर असते; पण या व्यासपीठावर बोलून काही उपयोग नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगिले. महादेवराव, ताटात अंडे दिसले नाही !महादेवराव महाडिक यांच्या कोंबड्या व अंड्यांच्या आकडेवारीवर बोलताना, महादेवराव, अब्जावधी अंड्यांचे उत्पादन होते असे सांगता, पण आजच्या दुपारच्या जेवणात ताटात भरलेले वांगेच मिळाले. जरा नीट माहिती सांगा, आमच्या ताटात वांग येणार नाही, याची काळजी घ्या, असा टोला पवार यांनी हाणला.
धनंजय महाडिक यांच्याशी आपले राजकीय मतभेद
By admin | Published: January 28, 2017 12:51 AM