लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे रविवारी मध्यरात्री पडलेल्या सशस्त्र दरोड्यात महिलेला ठार करून आठ लाख रुपयांचा ऐवज लूटप्रकरणी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी निकम कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी घटनास्थळाची पाहणी करून या घटनेचा तत्काळ तपास करण्याचे आदेश त्यांनी दिले.यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, दरोडेखोरांचा तत्काळ शोध घेणे गरजेचे आहे. या घटनेमुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत खळबळ उडाली असून, या घटनेचा शोध घेण्यासाठी तेरा पथके तैनात करण्यात आली आहेत. घटना गंभीर आहे, त्यामुळे दरोडेखोरांना जेरंबद करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. यावेळी पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, विनायक नरळे, शिरोळचे पोलीस निरीक्षक उदय डुबल, जयसिंगपूरचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम उपस्थित होते.निकम यांच्या प्रकृतीत सुधारणाजखमी बाबूराव निकम यांच्यावर मिरज येथील मिशन रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यांना मानसिक धक्का बसला असून, अद्याप त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांसमोर तपासासाठी अडचणी येत आहेत. उपअधीक्षक रमेश सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा विशेष पथके कार्यरत आहेत.पोलीस चौकी गरजेची : गेल्या दहा वर्षांपासून उदगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून उदगाव येथे पोलीस चौकीसाठी पाठपुरावा सुरू आहे. अपघात, वाढते गुन्हे व अशा प्रकारचे दरोडे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायतीने पोलीस चौकीसाठी जागाही उपलब्ध करून देऊ, असे सांगितले आहे. त्यामुळे वरिष्ठांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
उदगावमधील दरोड्याच्या तपासासाठी तेरा पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:46 AM